इचलकरंजी शहरवासियांना पाण्यासाठी खूपच वणवण करावी लागते. पाण्याची तीव्र टंचाई जाणवत राहते. सुळकूड पाणी योजना नुकतीच मंजूर देखील झालेली आहे. शहरवासीयांना शुद्ध व मुबलक पाणी मिळावे, यासाठी शासनाने मंजूर केलेल्या सुळकूड़- दूधगंगा योजना सुरू करून द्यावी, यासाठी स्थापन झालेल्या कृती समितीच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत. गुरुवारी मनसेचे नेते राज ठाकरे आणि विरोधी पक्षनेते अंबादास दानवे या दोघांना भेटून पाणीप्रश्नाबाबत निवेदन देण्यात आले.
शासनाने सुळकूड (ता. कागल) येथून दूधगंगा नदीतील पाणी देण्याची योजना मंजूर केली.
परंतु दूधगंगा काठावरील विरोधामुळे त्याचे काम रखडले आहे. या विरोधाला पूर्वीच्या वारणा-दानोळी (ता. शिरोळ) योजनेला झालेल्या विरोधाचीही पार्श्वभूमी कारणीभूत आहे. या शहराला विरोध केला तर चालतंय, अशी भावना काहीजणांची बनली आहे. त्यामुळे कृती समितीने या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी वेळोवेळी आंदोलने केली आहेत. कृती समितीने मुंबई येथे जाऊन मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांची भेट घेतली. स्थानिक आमदार-खासदारांनी याबाबत मुख्यमंत्र्यांसोबत बैठक लावून मार्ग काढण्याचे आश्वासन देत वातावरण शांत ठेवले.
शहराला योजना मंजूर असतानाही त्याची अंमलबजावणी होत नाही. त्यासाठी आपण मुख्यमंत्र्यांना भेटून या योजनेबाबत वस्तुस्थिती सांगावी, अशी मागणी केली. यावेळी समितीचे समन्वयक प्रताप होगाडे, पुंडलिक जाधव, विकास चौगुले, अभिजित पटवा, राजू कुन्नूर, राजू आरगे, सुनील बारवाडे आदी उपस्थित होते.