लोकसभेच्या तयारीसाठी शिंदेसेनेचे (शिवसेना एकनाथ शिंदे गट) राष्ट्रीय महाअधिवेशन 16,17 फेब्रुवारी रोजी कोल्हापुरातील महासैनिक दरबार हॉल येथे होणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यात शिंदेसेनेचे दोन आमदार, दोन खासदार आहेत. अधिवेशनासाठी 9 मंत्री, 13 खासदार आणि 43 आमदार यांच्यासह देशभरातील चार हजारांवर पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. त्यांच्याकरिता 100 हॉटेलांतील 2000 खोल्या बुक करण्यात आल्या आहेत.हे अधिवेशनात तीन सत्रांमध्ये होणार आहे.तिसऱ्या सत्राच्या समारोपानंतर संध्याकाळी जाहीर सभेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
पहिल्या सत्रात पक्षाच्या संघटनात्मक बाबींवर चर्चा होणार आहे. पक्ष संघटनेच्या कामाचा आढावा या सत्रामध्ये घेतला जाणार आहे. पहिल्या सत्रातच पक्षाच्या दृष्टीने महत्वपूर्ण राजकीय ठराव सादर केले जाणार आहेत. त्यावर दुसऱ्या सत्रात विचार विनिमय व चर्चा केली जाणार असून याच सत्रामध्ये ते मंजूर केले जातील. तिसऱ्या सत्रामध्ये निवडणुकांच्या तयारीसंदर्भात नेते व पदाधिकाऱ्यांमध्ये चर्चा होईल.
तिसऱ्या सत्राच्या समारोपानंतर संध्याकाळी जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेला शिवसेनेचे प्रमुख नेते आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पक्षाचे वरिष्ठ नेते संबोधित करतील.