वस्त्रनगरीची शान असणाऱ्या राजाराम मैदान व स्टेडियमच्या दुरूस्तीसाठी तातडीने जिल्हा नियोजन आणि विकास समितीच्या माध्यमातून साठ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. त्यामुळे येत्या काळात राजाराम मैदानाचे रुपडे पालटणार असल्याची माहिती इचलकरंजी शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष विठ्ठल चोपडे यांनी दिली.
यासंदर्भात त्यांनी सांगितले कि, मैदानावर सराव करणारे खेळाडू आणि व्यायामासाठी येणारे नागरिकांनी मैदानाच्या दुरवस्थेबाबत आपल्याकडे गाऱ्हाणे मांडून दुरुस्तीबाबत मागणी केली होती. त्यानुसार जिल्ह्याचे पालकमंत्री ना. हसन मुश्रीफ यांना राजाराम मैदानासंबंधी वस्तुस्थिती कथन केली.
महापालिकेचे राजाराम स्टेडियम पश्चिम महाराष्ट्रातील एक उत्कृष्ट स्टेडियम असून शेकडो क्रिकेट खेळाडू या ठिकाणी दररोज क्रिकेट खेळतात तसेच शहरातील अनेक लोक सकाळी व संध्याकाळी व्यायामासाठी या मैदानाचा वापर करतात. पोलीस तसेच सैन्य भरती आणि इतर अनेक स्पर्धांचा सराव करणारे खेळाडू या मैदानाचा लाभ घेतात. राजाराम स्टेडियमचे छतावर लावलेले सिमेंटचे पत्रे तीस वर्षांपूर्वीचे असलेने अत्यंत खराब झालेले आहेत.
अनेक पत्रे फुटलेल्या स्थितीत आहेत. त्यामुळे ते खाली पडून मैदानावर दुर्घटना घडण्याचा संभव आहे. त्यामुळे मैदान व स्टेडियम दुरूस्तीसाठी निधी मिळावा अशी मागणी केली होती. याची दखल घेत पालकमंत्री मुश्रीफ यांनी तातडीने निधी उपलब्ध करून दिला आहे.
नाम. हसन मुश्रीफ यांनी मंजूर केलेल्या निधीतून स्टेडियमचे संपूर्ण पत्रे बदलण्यात येणार आहेत. तसेच ग्रील व इतर लोखंडी साहित्याची दुरुस्ती करण्यात येणार आहे. सर्व गेट दुरुस्त करून स्टेडियमचे आतील बाजूची रंगरंगोटी करण्यात येणार आहे. तसेच मैदानावरील हिरवळ (लॉन) बदलण्यात येणार आहे.
खेळाडूंसाठी ड्रेसिंग रूम आणि टॉयलेट, बाथरूम सुस्थितीत करण्यात येणार आहे. यासाठी निधीची तरतूद होऊन अंदाजपत्रक प्रशासकीय मंजुरीसाठी सादर करण्यात आले आहे. साधारणत: या महिना अखेरपर्यंत या कामाची निविदा प्रसिद्ध होऊन लवकरच या कामाची सुरुवात होईल.
यामुळे दुरवस्था झालेल्या इचलकरंजी महापालिकेच्या राजाराम स्टेडियमला पुन्हा गत वैभव प्राप्त होणार आहे, असे शेवटी विठ्ठल चोपडे यांनी सांगितले.