जयंत पाटलांच्या बालेकिल्ल्यात मुख्यमंत्री उतरणार….

राज्यातील सत्ताधारी महायुतीच्या नेत्यांकडून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते व आमदार जयंत पाटील यांना लक्ष्य केले जात आहे. महायुतीचे अनेक नेते जयंतरावांच्या बालेकिल्ल्यात येत आहेत.दहा दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी इस्लामपुरात पक्ष कार्यालय सुरू केले होते.

त्यानंतर आता 25 फेब्रुवारीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे येत आहेत. शहरातील विविध विकासकामांचे उद्घाटन मुख्यमंत्री करतील. त्यामुळे आगामी निवडणुकीच्या तोंडावर जयंत पाटील यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे चित्र आहे.

जिल्ह्यातील ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमांतर्गत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक मंत्री 25 फेब्रुवारीला इस्लामपूर शहरात येणार असल्याने त्याबाबतची तयारी शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख आनंदराव पवार यांनी सुरू केली आहे.

मुख्यमंत्री शिंदे यांचा शहरातील खुले नाट्यगृह या ठिकाणी जाहीर कार्यक्रम होणार आहे. संपूर्ण राज्यभर शासन आपल्या दारी योजना कल्याणकारी हा कार्यक्रम राज्याचे मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या उपस्थितीत सरकार राबवत आहे.