इचलकरंजीत सव्वा लाखाचा मुद्देमाल जप्त…

सध्याच्या काळात अनेक अवैध्य धंदे राजरोसपणे सुरु असलेले पहायला मिळत आहेत. इचलकरंजीत अशाच गांचा विक्री प्रकरणी एकास अटक केली आहे. बेकायदेशीरपणे वाहतुकीसह गांजा विक्री प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी निलेश नरेंद्र कांबळे (वय ३१ रा. तीनबत्ती चौक) याला अटक केली आहे.

याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, शिवाजीनगर अलायन्स हॉस्पिटलच्या पोलिसांनी पाठीमागील बाजूस असलेल्या लायकर मळ्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर संशयित निलेश कांबळे हा गांजा विक्री करण्यासाठी येणार असल्याची खबर पोलिस कॉन्स्टेबल सुनिल बाईत यांना गोपनीय बातमीदारामार्फत मिळाली होती. त्याची कल्पना वरिष्ठांना देऊन त्यांच्या सुचनेनुसार १९ फेब्रुवारी रोजी रात्रीच्या सुमारास शिवाजीनगर पोलिसांच्या पथकाने लायकर मळ्याकडे जाणाऱ्या मार्गावर सापळा रचला.

येणाऱ्या – जाणाऱ्या सर्वच वाहनांची तपासणी करत असताना दुचाकीवरून आलेल्या निलेश कांबळे याला संशयावरून थांबवून त्याची झडती घेण्यात आली. त्यामध्ये त्याच्याकडे १ किलो १९३ ग्रॅम गांजा मिळून आला. त्यामुळे त्याला ताब्यात घेऊन त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. त्याच्याकडील १७ हजार ९८५ रुपयांचा गांजा, १० हजाराचा मोबाईल आणि १ लाख १० हजाराची इलेक्ट्रिक दुचाकी असा १ लाख ३७ हजार ८९५ रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता २ दिवस पोलीस कोठडी सुनावली.

ही कारवाई पोलिस निरीक्षक राजू ताशिलदार यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक नाथा गळवे, वसंत घुगे, सुकुमार बरगाले, विजय माळवदे, सतिश कुंभार, सुनिल बाईत, अरविंद माने व प्रविण कांबळे यांच्या पथकाने केली.