24 फेब्रुवारीपासून मनोज जरांगेंचा ‘रास्ता रोको’

 मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्यासाठी सगेसोयरे अध्यादेशाची अमलबजावणी करण्यात यावी या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी पुन्हा 24 फेब्रुवारीपासून राज्यव्यापी आंदोलनाची घोषणा केली आहे. ज्यात राज्यातील प्रत्येक गावात एकाचवेळी पुढील आठ दिवस रास्ता रोको आंदोलन केले जाणार आहे. जरांगे यांच्या याच आंदोलनाचा पहिला फटका उद्धव ठाकरे यांना बसला आहे.

कारण 24 फेब्रुवारीपासून सुरु होणारे हे आंदोलन लक्षात घेता उद्धव ठाकरे यांनी आपला 24 तारखेचा हिंगोली दौरा रद्द केल्याची माहिती मिळत आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे वेगवेगळ्या लोकसभा मतदारसंघाचा दौरा करत आहेत. आज आणि उद्या ते बुलढाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. तसेच, 24 फेब्रुवारीला ते हिंगोली लोकसभा मतदारसंघाचा दौरा करणार होते.

मात्र, मराठा आरक्षण प्रश्न पुन्हा एकदा तापला असून, मनोज जरांगे पाटील यांनी 24 तारखेपासून आंदोलनाचा इशारा दिला आहे. 24 तारखेपासून गावागावात रास्ता रोको होणार असल्याने हिंगोली लोकसभा मतदारसंघातील उद्धव ठाकरे यांचा  नियोजित दौरा रद्द करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.