कोकणात ‘उबाठा’ला खिंडार, उद्धव ठाकरेंच्या विश्वासू समर्थकांनी साथ सोडली

कोकणात आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका लक्षात घेता राजकीय घडामोडींना वेग आला आहे. उद्योग मंत्री उदय सामंत यांचे ज्येष्ठ बंधू आणि शिवसेना आमदार किरण उर्फ भैया सामंत यांनी शिवसेना पक्षाला धक्का दिला आहे. सामंत राजापूर मतदारसंघात ॲक्शन मोडवर आले असून गेले काही महिने त्यांचे प्रत्येक गावात दौरेही सुरु आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक लक्षात घेत त्यांनी आपले नेटवर्क स्ट्राँग करण्यास सुरुवात केली आहे. मतदारसंघातील प्रत्येक जिल्हा परिषद गटावर किरण सामंत यांनी लक्ष केंद्रित केलं आहे. याच दरम्यान किरण सामंत यांची सुकन्या अपूर्वा सामंतही गेले काही महिने मतदारसंघात अॅक्टिव्ह आहेत. त्याच वेळी मंत्री सामंत बंधूंनी अलिकडे शिवसेनेत पक्षप्रवेशांचा धुमधडाका लावला आहे.

गणेशोत्सवाचे औचित्य साधून दोन्ही बंधूंनी गणपती दर्शन कार्यक्रमाच्या निमित्ताने वैयक्तिक गाठीभेटी सुरु केल्या. याच वेळी पक्षप्रवेश कार्यक्रम घेत आगामी निवडणुकीच्या तयारीचे स्पष्ट संकेत दिले आहेत.

लांजा राजापूर साखरपा मतदारसंघातील ताम्हणे सौंदरकरवाडी व ताम्हाणे वरचीवाडीतील ठाकरे गटातील ताम्हणे सरपंच समीक्षा बावस्कर यांच्यासह ठाकरे गटाचे खंदे समर्थक असलेले ज्येष्ठ शिवसैनिक रवींद्र सावंत, शाखाप्रमुख भाई अडसूळ यांच्यासह ज्येष्ठ शिवसैनिक व कार्यकर्त्यांनी काही ग्रामस्थांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून शिंदेंच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे.

यावेळी पाचल विभागातील उद्धव ठाकरे गटातील अनेक पदाधिकाऱ्यांनीही प्रवेश केला आहे. उपमुख्यमंत्री व शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या धोरणांवर व आमदार किरण सामंत यांच्या कार्यशैलीवर विश्वास ठेवून या भागातील शेकडो ग्रामस्थांनी शिवसेना पक्षात प्रवेश केल्याची प्रतिक्रिया या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी दिली आहे. राजापूर तालुक्यातील पाचल विभागात शिवसेनेत मोठा पक्षप्रवेश झाला असून उद्धव ठाकरे गटाला खिंडार पडले आहे.

पाचल येथे झालेल्या शिवसेना पक्षप्रवेश कार्यक्रमावेळी आमदार किरण सामंत यांनी उपस्थित ग्रामस्थांशी संवाद साधला. “माझ्यावर ज्यांनी ज्यांनी विश्वास ठेवून शिवसेना पक्षात प्रवेश केला आहे, त्या प्रत्येकाच्या विश्वासाला कुठेही तडा जाऊ देणार नाही. पाचलसह संपूर्ण राजापूर तालुक्याचा विकास हा माझा ध्यास आहे. आपल्या सर्वांच्या सोबत काम करताना विकासकामांसाठी निधी कमी पडू देणार नाही,” असा शब्दही त्यांनी ग्रामस्थांना दिला आहे.