इचलकरंजीतील उद्यानात येणार आता नवीन खेळणी

इचलकरंजी शहरात अनेक उद्याने लहान मुलांसाठी आहेत. पण अनेक उद्यानाची खूपच दुरावस्था झालेली आहे. महापालिकेच्या महत्त्‍वाच्या तीन उद्यानांत आता बच्चे कंपनीसाठी नवीन खेळणी येणार आहेत. यासाठी आमदार सतेज पाटील यांनी स्थानिक विकास निधीतून २५ लाखांचा निधी मंजूर केला आहे. याबाबतचे अंदाजपत्रक तयार करण्याची कार्यवाही महापालिका प्रशासनाकडून करण्यात येणार आहे. यासाठी काँग्रेसचे माजी नगरसेवक शशांक बावचकर पाठपुरावा करीत आहेत. आचारसंहिता लागण्यापूर्वी हे काम मार्गी लागल्यास आगामी उन्हाळ्यातील सुटीत लहान मुलांना नवीन खेळण्यांचा आनंद घेता येणार आहे.


महापालिकेच्या मालकीची शहरात तीन मोठी उद्याने आहेत. यामध्ये भगतसिंग उद्याग, राणी बाग व सुंदर बाग या तिन्ही उद्यानांत दररोज सांयकाळी नागरिक गर्दी करीत असतात. या उद्यानात लहान मुलांसाठी विविध खेळणी बसवली होती. मात्र यातील अनेक खेळणी खराब झाली आहेत.त्यामुळे उद्यानात आलेल्या लहान मुलांना या खेळण्यांचा वापर करता येत नाही. त्यामुळे त्यांच्या आनंदावर विरजण पडते.

या तिन्ही उद्यानांत नवीन खेळणी बसवण्यासाठी बावचकर यांनी आमदार पाटील यांच्याकडे निधीची मागणी केली होती. त्याला प्रतिसाद देत आमदार पाटील यांनी संबंधित तीन उद्यानांत लहान मुलांची खेळणी बसवण्यासाठी २५ लाखांचा निधी जिल्हा नियोजन समितीकडे प्रस्तावित केला आहे.