विटाच्या सुधारित पाणीपुरवठा योजनेस मंजुरी…..

विटा शहराच्या सुधारित पाणीपुरवठा योजना आणि भुयारी गटार योजनेस तात्काळ प्रशासकीय मान्यता मिळावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष वैभव पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे. याबाबत अधिक माहिती अशी, विटा शहरासाठी पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरळीत करण्यासाठी महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान महाअभियानाअंतर्गत विटा नगरपरिषदेच्या सुधारित पाणी पुरवठा योजना व विटा नगरपरिषद हद्दीमध्ये भुयारी गटार योजना या दोन्ही योजनांना प्रशासकीय मंजुरीसाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माजी आम. सदाशिवराव पाटील आणि राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष वैभव पाटील यांनी भेट घेतली.

यावेळी विटा नगरपरिषदेच्या सुधारित पाणी पुरवठा योजनेसाठी रु.८७.१८ कोटी खर्चाची व भुयारी गटार योजनेसाठी रु.७८ कोटींची आर्थिक तरतूद तात्काळ करावी, अशी विनंती केली. या दोन्ही मागणीनुसार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तात्काळ नगरविकास मुख्य सचिवांना कार्यवाहीचे आदेश दिले व लवकरात लवकर यासाठीची प्रशासकीय बैठक बोलावून मंजुरीसाठीचे आदेश पारित करण्यासाठीच्या सूचना देण्यात आल्याची माहिती वैभव पाटील यांनी दिली आहे.