मराठा आरक्षणाच्या आंदोलनात अनेकांविरुद्ध विविध पोलिस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल झाले आहेत. पण, ज्या आंदोलनात आर्थिक नुकसान व जीवितहानी झालेली नाही, असे गुन्हे आता मागे घेतले जाणार आहेत.गृह विभागाने पोलिसांना त्यासंबंधीचे आदेश दिले असून ३१ जानेवारीपर्यंतच्या अशा गुन्ह्यांची माहिती संकलित केली जात आहे.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मागील काही महिन्यांपासून राज्यभर आंदोलने, उपोषणे, रास्ता रोको सुरू आहेत. काही दिवसांपूर्वी जालना, बीड अशा ठिकाणी जाळपोळीच्या घटना देखील घडल्या. पण, मराठा आरक्षणाचे आंदोलन सुरू झाल्यापासून ३१ जानेवारीपर्यंत अहिंसक गुन्हे मागे घेतले जाणार आहेत. ज्या आंदोलनात आंदोलकांकडून कोणतेही आर्थिक व जीवितहानी झालेली नाही, त्यांच्यावरील गुन्हे मागे घेतले जाणार आहेत.
पण, आता कोणीही रास्ता रोको करून सर्वसामान्य जनतेला वेठीस धरू नये, सर्वांना एकत्रित फिरण्याचा अधिकार जरी घटनेने दिला तरी सर्वसामान्यांच्या हितासाठी त्यावर निर्बंध घालण्याचाही अधिकार प्रशासनाला देण्यात आलेला आहे.