टोलनाक्याच्या मुद्द्यावरुन स्फोटक वक्तव्य करणाऱ्या राज ठाकरेंना राष्ट्रीय सुरक्षा कायद्यांतर्गत अटक करा, अशी मागणी आरपीआय खरात गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष सचिन खरात यांनी केली आहे. राज ठाकरे हे वैचारिक गोंधळलेले नेते असल्याची टीका देखील खरात यांनी केली आहे.
टोलनाक्यांवर आकारल्या जाणाऱ्या टोलच्या मुद्द्यावरुन राज ठाकरे आक्रमक झाले आहेत. कार आणि इतर छोट्या वाहनांसाठी टोल आकारला तर टोल नाके जाळून टाकू असा इशारा राज ठाकरे यांनी दिला होता. याच इशाऱ्यावरुन सचिन खरात यांनी राज ठाकरेंना अटक करण्याची मागणी केली आहे.
राज ठाकरे यांनी राष्ट्रीय सुरक्षा कायद्यांतर्गत अटक करा, अशी मागणी सचिन खरात यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. राज ठाकरे हे वैचारिक गोंधळलेले नेते असून त्यांची मराठी पाटी आणि टोलनाका ही आंदोलने फेल ठरली असल्याची टीकाही खरात यांनी केली.
काय म्हणाले होते राज ठाकरे
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात टोलबंदी असल्याचे वक्तव्य केले होते. हाच व्हिडीओ दाखवत त्यांनी फडणवीस धादांत खोटे बोलत असल्याची टीका त्यांनी केली. तसेच टोलनाक्यावर यापुढे गाड्या अडवल्या तर टोल जाळून टाकू, असा इशाराही त्यांनी सरकारला दिला आहे.
गोपीचंद पडळकर यांना इशारा
उपमुख्यमंत्री अजित पवार हे बहुजनांचे नेते आहे. ते विकासपुरुष आहेत. मात्र त्यांच्यावर खालच्या पातळीवर टीका केली जात आहे. त्यामुळे अजित पवार यांच्यावर पुन्हा टीका कराल तर राज्यात फिरू देणार नाही, असा इशाराच खरात गटाकडून आमदार गोपीचंद पडळकर यांना देण्यात आला आहे.