अचानक टेंभू योजनेचे सोडलेले पाणी बंद केल्याने शेतकरी बनले संतप्त; शाखाधिकाऱ्यावर कारवाईची मागणी 

ढवळेश्वरमधील इरिगेशन टँक तलावमधून ओढयाला टेंभू योजनेचे सोडलेले पाणी राजकीय दबावापोटी बंद केल्याने संतप्त बनलेल्या राहुल मंडले, अभिषेक शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी आणि पडळकर समर्थकांनी टेंभूचे पाणी आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे, टेंभूचे पाणी बंद करणाऱ्या शाखाधिकारी अमितकुमार साठे यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे अशी जोरदार घोषणाबाजी करत आज सुळेवाडी येथील जलसंपदा विभागाच्या पाटबंधारे आणि टेंभू योजनेच्या शाखा कार्यालयास टाळे ठोक ठोकून कार्यालयातील अधिकाऱ्यांना कोंडून ठेवले.

त्यामुळे कार्यालयात उपस्थित असणाऱ्या कालवा निरीक्षक राजश्री नलवडे यांच्यासह अन्य अधिकारी व कर्मचारी ऑफिसमध्येच अडकून राहिले होते. टेंभूचे पाणी सोडल्याशिवाय इथून उठणार नाही असा पवित्रा घेत शेतकऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी करत कार्यालयाच्या पायरीवर बसून ठिय्या आंदोलन सुरू केले. त्यामुळे अचानक कार्यालय परिसरात वातावरण तणावपूर्ण बनले होते. या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक विशाल येळेकर आणि पोलीस उपनिरीक्षक पूजा महाजन या पोलिस कर्मचाऱ्यास आंदोलनस्थळी दाखल झाले. मात्र आंदोलनकर्ते ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हते.

परंतु तब्बल तासाभरानंतर जलसंपदा विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी फोनवरून सकारात्मक चर्चा झाल्यानंतर आक्रमक बनलेल्या शेतकऱ्यांनी कार्यालयाचे कुलूप उघडून अधिकाऱ्यांना मुक्त केले. त्यानंतर पुन्हा ढवळेश्वरमधील इरिगेशन टँक तलावमधून ओढयाला टेंभू योजनेचे पाणी सोडण्यात आले.