सर्व खाजगी शाळांकरिता १ कोटी ४७ लाखाची बक्षिसे! हातकणंगले न्यूज

भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेअंतर्गत मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हे स्पर्धात्मक अभियान राज्यातील सर्व माध्यमाच्या सर्व व्यवस्थापनाच्या शाळाकरिता राबवण्यात येत आहे.

पहिल्यांदाच खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांचा यामध्ये सहभाग होणार आहे केंद्र, तालुका, जिल्हा, विभाग व राज्य अशा एकूण पाच स्तरावरून ही स्पर्धा घेण्यात येणार आहे. प्रत्येक स्तरावर शंभर गुणांचे गुणांकन करून शाळांचे मूल्यांकन करण्यात येणार आहे. हे मूल्यांकन दोन विभागात विभागलेले आहे.

यामध्ये विद्यार्थी केंद्रित उपक्रमांचे आयोजन व त्यामधील विद्यार्थ्यांचा सहभाग 60 गुण आणि शाळा व्यवस्थापनाकडून आयोजित विविध उपक्रम व त्यातील विविध घटकांचा सहभाग 40 गुण तालुकास्तर ते राज्यस्तर प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाचे रोख रक्कम पारितोषक देण्यात येणार आहे. प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांकासाठी अनुक्रमे तालुकास्तरावर तीन लाख, दोन लाख व एक लाख जिल्हास्तरावर अकरा लाख, पाच लाख व तीन लाख विभाग स्तरावर 21 लाख, 11 लाख व सात लाख तर राज्यस्तरावर 51 लाख, 21 लाख व 11 लाख अशा भरघोस बक्षीसांची घोषणा करण्यात आली आहे.

शासनामार्फत केंद्रस्तरावर केंद्रप्रमुख तालुकास्तरावर गटविकास अधिकारी, जिल्हास्तरावर मुख्य कार्यकारी अधिकारी, विभाग स्तरावर शिक्षण उपसंचालक व राज्यस्तरावर शिक्षण आयुक्त यांचे अध्यक्षतेखाली समिती गठीत करून प्रत्येक स्तरावर मूल्यमापन करण्यात येणार आहे.

याबाबत महाराष्ट्र शासनाने दिनांक ३० नोव्हेंबर २०२३ रोजी शासन निर्णय निर्गमित केला आहे. सर्व शाळांनी आपले स्तरावरून स्वमूल्यमापन करून केंद्र स्तरावरील स्पर्धे करिता तयारी करणे बाबत याद्वारे शिक्षणाधिकारी माध्यमिक डॉ. एकनाथ आंबोकर यांनी आवाहन केले आहे.