इचलकरंजीत राम मंदिरात चोरी! चक्क पळविली दानपेटीच……

इचलकरंजी शहर परिसरात घरफोड्या चोऱ्यांचे, प्रमाण वाढल्याचे दिसून येते. त्यामुळे चोरटे शहरातील विविध मंदिरांवर लक्ष केंद्रीत करून दागदागिने, दानपेटी फोडण्याचे प्रकार वाढत चालले आहेत. महासत्ता चौकातील मारूती मंदिरातील दानपेटी दोनवेळा लंपास करण्याची घटना घडली. त्यानंतर वर्धमान चौकातील जैन मंदिरात चोरी करून लाखोचा ऐवज लंपास केला. तर मध्यवर्ती गजबजलेल्या सातपुते गल्लीतील श्री राम मंदिरातील दानपेटी चोरट्यांनी लंपास केली.

वाढत्या चोऱ्यांमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात आहे. त्यामुळे रात्रीच्यावेळी पोलिस गस्त घालतात कि नाही? अशी शंका उपस्थित होत आहे. इचलकरंजी येथील सातपुते गल्लीतील श्रीराम मंदिरातील दानपेटी चोरट्यांनी लंपास केली. बुधवारी पहाटे हा प्रकार उघडकीस आला. चोरट्यांनी आता मंदिरांना लक्ष केल्याने या घटनेने खळबळ उडाली आहे. याबाबतची माहिती शिवाजीनगर पोलिसांना देण्यात आली आहे.

याबाबत समजलेली माहिती अशी, सातपुते गल्लीत श्रीराम मंदिर आहे. याठिकाणी मंदिर परिसरात पुजारी राहण्यास आहेत. चोरट्यांनी मंदिराच्या गेटवर चढून आत प्रवेश केला असावा. पुजारी यांच्या घराला बाहेरुन कडी लावण्यात आली. मंदिराच्या दरवाजाचा कडी कोयंडा उचकटून गाभाऱ्यात ठेवलेली दानपेटी चोरट्यांनी पळवून नेली. नुकताच मंदिरात मोठा कार्यक्रम झाला होता. त्यामुळे दानपेटीत मोठी रक्कम असण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

चोरीची माहिती श्रीराम जन्मोत्सव मंडळाचे अध्यक्ष म्हाळसाकांत कवडे यांनी शिवाजीनगर पोलिसांना दिली. आठवडभरात मंदिरात चोरीचा हा दुसरा प्रकार आहे. भरवस्तीत झालेल्या चोरीच्या घटनेने नागरिकांत भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
दरम्यान, भागातील नागरिकांनी पोलिसांना निवेदन दिले असून त्यामध्ये भागामध्ये भुरट्या चोन्यांसह चोरट्यांचा उपद्रव वाढला आहे. त्यामुळे नागरिकांना त्रास होत असल्याने चोरट्यांना बंदोबस्त करावा, गस्त वाढवावी आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.