जयंतरावांच्या बालेकिल्ल्यातील ….

गेल्या पंधरा दिवसापासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा चर्चेत असलेला इस्लामपूर दौरा रद्द झाला आहे. शिंदेंच्या सेनेकडून या दौऱ्याबाबतची जोरदार तयारी करण्यात येत होती, मात्र अचानक दौरा रद्द झाल्याने तयारीवर पाणी फिरले.

राज्यातील सत्ताधारी महायुतीच्या नेत्यांकडून शरदचंद्र पवार पक्षाचे नेते व आमदार जयंत पाटील यांना इस्लामपुरात येऊन लक्ष केले जात आहे. परंतु तूर्त मुख्यमंत्री शिंदे यांचा दौरा रद्द झाल्याने जयंतरावांच्या बालेकिल्ल्यातील राजकीय वातावरण शांत राहणार असल्याचे चित्र दिसते.जिल्ह्यातील शासन आपल्या दारी कार्यक्रमांतर्गत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक मंत्री इस्लामपूर शहरात येणार असल्याने त्याबाबतची तयारी शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख आनंदराव पवार यांनी सुरु केली होती.

मुख्यमंत्री शिंदे यांचा शहरातील खुले नाट्यगृह याठिकाणी जाहीर कार्यक्रम होणार होता. संपूर्ण राज्यभर शासन आपल्या दारी योजना कल्याणकारी हा कार्यक्रम राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या उपस्थितीत प्रशासन राबवत आहे. सांगली जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून शासन आपल्या दारी या कार्यक्रमाची चर्चा होती. पण जिल्ह्यात मुख्यमंत्र्यांनाच या कार्यक्रमासाठी आणण्याचा चंग शिंदे गटाने बांधला होता.