विधानसभेला दिसणार का लोकसभेचा गुलाल ?

लोकसभा निवडणुकीत धैर्यशील माने निवडून आले, तरी इस्लामपूर-शिराळा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजीत पाटील यांना आघाडी मिळाली. परंतु शरदचंद्र पवार राष्ट्रवादीच्या मतांचा टक्का घसरला आहे. हा निकाल जयंत पाटील आणि मानसिंगराव नाईक यांच्या नेतृत्वाला धक्का देणारा ठरला आहे.

यावर जयंत पाटील यांच्या समर्थकांनी इस्लामपूर शहरात महाराष्ट्रातील ऐतिहासिक विजयाचे धीरोदात्त नेतृत्व या आशयाचे डिजिटल पोस्टर्स लावून जयंत पाटील यांचे अभिनंदन केले आहे.आमदार जयंत पाटील यांच्या नेतृत्वात राज्यात आठ खासदार निवडून आले.

परंतु त्यांच्याच होमपीचवर महाविकास आघाडीला दणका बसला. याचे चिंतन करण्याची वेळ जयंत पाटील यांच्यावर आली आहे. याउलट महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांच्या विजयामध्ये किंगमेकर कोण यावर श्रेयवाद रंगला आहे. लोकसभेचा गुलाल आगामी विधानसभेला महायुतीमध्ये दिसणार का, असाही प्रश्न उपस्थित होत आहे.

दुसरीकडे मात्र महायुतीतील बहुतांशी नेते धैर्यशील माने यांच्या विजयाचा किंगमेकर आपणच असल्याचे सांगून विधानसभेसाठी दावेदारी करीत आहे. यात आनंदराव पवार, गौरव नायकवडी इस्लामपूर मतदारसंघातून इच्छुक आहेत. तरीही भाजपचे जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील यांनी गत निवडणुकीपासूनच दावेदार आहेत. शिराळा मतदारसंघातून सम्राट महाडिक, सत्यजित देशमुख आगामी विधानसभेच्या तयारीला लागले आहेत