विटा नगरपरिषदेचा सन २०२४-२५ या आर्थिक वर्षाचा तब्बल १४० कोटी ३ लाख ४७ हजार ५६५ रुपयांचा अर्थसंकल्प मंगळवारी प्रशासक डॉ. विक्रम बांदल यांनी प्रशासकीय सभेत मंजूर केला. या अर्थसंकल्पात महत्त्वाकांक्षी भुयारी गटर योजना प्रकल्पासाठी ११ कोटी रुपयांची भरीव तरतूद करण्यात आली असून शहर विकासाला चालना देण्याचा प्रयत्न या अर्थसंकल्पात करण्यात आला आहे.
विटा नगरपरिषदेच्या लोकनेते हणमंतराव पाटील सभागृहात मंगळवारी प्रशासक डॉ. विक्रम बांदल यांच्या अध्यक्षतेखाली अर्थसंकल्पीय प्रशासकीय सभा पार पडली. यावेळी मुख्याधिकारी विक्रमसिंह पाटील, उपमुख्याधिकारी स्वप्निल खामकर यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.
विटा नगरपरिषदेला मिळणाऱ्या उत्पन्नापैकी घरपट्टी करापासून ६ कोटी ५५ लाख २२ हजार २५० रुपये उत्पन्न अपेक्षित धरण्यात आले आहे. पाणीपट्टी करापासून ४ कोटी ५० लाख, मालमत्ता व फी पासून ४ कोटी १० लाख ६३ हजार ५००, महसुली अनुदानातून १९ कोटी ६२ लाख ७२ हजार ६५ तर भांडवली अनुदानातून ५३ कोटी १० लाख ९० हजार असे एकूण विविध करापासून १२१ कोटी ५८ लाख ५३ हजार २९५ रुपये उत्पन्न अपेक्षित धरण्यात आले आहे.