ईश्वरपूर नगराध्यक्षपदासाठी भाजपचे उमेदवार विश्वनाथ डांगे यांनी शुक्रवारी जोरदार शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला. सर्वसामान्य माणसांशी नाळ जोडणारे नेतृत्व भाजपकडे असल्याने ईश्वरपूरचा नगराध्यक्ष भाजपचाच असेल, असा विश्वास यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रचारसभेत व्यक्त केला.
यावेळी आ. सदाभाऊ खोत, आमदार सत्यजित देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील, भाजपचे विक्रम पाटील, सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक राहुल महाडिक, भाजपचे जिल्हाप्रमुख सम्राट महाडिक, शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख आनंदराव पवार उपस्थित होते.
उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी पंचायत समितीपासून आतषबाजीत मिरवणूक काढण्यात आली. आझाद चौकात मुस्लिम बांधवांकडून शुभेच्छा घेत काढण्यात आलेल्या मिरवणुकीचे यल्लमा चौकात जाहीर सभेत रुपांतर झाले.
जाहीर सभेत भाजपचे जिल्हाध्यक्ष महाडिक यांनी विरोधकांनी हिम्मत असेल तर उमेदवार निवडून आणून दाखवावा, असे जाहीर आव्हान देत इस्लामपूरचे नाव बदलून ईश्वरपूर करण्यात पालकमंत्री श्री. पाटील यांचे मोलाचे योगदान आहे, असे सांगितले. यावेळी भाजपचे विक्रम पाटील यांनी विरोधकांनी पसरवलेल्या अफवांना प्रतिवाद करताना सांगितले, मी भाजपचा कट्टर कार्यकर्ता असून, शहरात भाजपचीच सत्ता येईल, असा विश्वास व्यक्त केला. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे जिल्हाध्यक्ष भोसले-पाटील म्हणाले, भाजी मंडईच्या ५४ कोटींच्या कामाला सुरुवात झाली असून, ४.९ किलोमीटर भुयारी गटार योजनेत विरोधी गटाने घातलेल्या अडथळ्यांमुळे कामाला गती देता आली नसली तरी आता भाजपच्या नेतृत्वाखाली या कामाला निश्चितच गती मिळेल. आ. खोत यांनी चाळीस वर्षे सत्ता असतानाही शहराचे नामांतर का करता आले नाही, याचे उत्तर लोकप्रतिनिधींनी द्यावे, असे खुले आव्हान आमदार जयंत पाटील यांना दिले.
