इचलकरंजीच्या पाणी योजनेची बैठक म्हणजे नाटक…

इचलकरंजी शहराच्या सुळकूड पाणी योजनेबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आयोजित केलेली बैठक म्हणजे केवळ नाटक होते. पाण्यासाठी तडफडणार्‍या पाच लाख जनतेची हि घोर फसवणूक आहे.

योजनेचा पाठपुरावा कायम राहणार असून आता खासदार-आमदारांना विचारात न घेता लढा सुरुच राहिल, अशी भूमिका कृती समितीच्या वतीने मदन कारंडे यांनी शनिवारी व्यक्त केली.राज्य शासनाने इचलकरंजीसाठी दुधगंगा पाणी योजना मंजूर केली आहे. दुधगंगा नदीकाठावरुन या योजनेला तीव्र विरोध होत असल्याने काल मुख्यमंत्री शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या बैठकीत समिती नियुक्त करुन एक महिन्यात अहवाल देण्याचे निर्देश दिले गेले.

याबाबत कारंडे म्हणाले, काळाच्या बैठकीत केवळ आपले राजकीय हित सांभाळण्यासाठी कागल व शिरोळ तालुक्यातील नेत्यांनी या योजनेला विरोध सुरु केला आहे. तथापि, इचलकरंजीतील खासदार,आमदार यांनी बोटचेपी भूमिका घेतली आहे. समितीकडून सुळकूड योजनेबाबत सकारात्मक भूमिका मांडल्यावरही त्याला विरोध होणार नाही याची खात्री कोण देणार ? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. इचलकरंजीची ही योजनाच नाकारण्याचे राजकीय डावपेच यामध्ये दिसून आले आहेत, असेही कारंडे यांनी सांगितले.