तिरंगी लढतीवर ठरणार सांगलीचा भावी खासदार

गत पंचवार्षिक सांगलीलोकसभानिवडणूक तिरंगी झाली होती. त्यामुळे कॉंग्रेसच्या मतांमध्ये विभाजन होऊन भाजपचे संजय पाटील यांचा विजय सोपा झाला. हीच खेळी भाजपकडून पुन्हा खेळली जाण्याची शक्यता आहे.

त्यामुळे संजय पाटील विरुद्ध विशाल पाटील यांच्यात दुरंगी लढत होणार की अपक्ष उमेदवार चंद्रहार पाटील रिंगणात उतरल्यास तिरंगी होणार आहे. यावर सांगलीचा भावी खासदार ठरण्याची शक्यता आहे. सांगली लोकसभा हा १९६२ ते २०१४ पर्यंत कॉंग्रेस पक्षाचा बालेकिल्ला होता. मात्र, २०१४ च्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लाटेत कॉंग्रेसचे विद्यमान केंद्रीय राज्यमंत्री प्रतीक पाटील यांचा पराभव झाला.

पूर्वी कॉंग्रेसमध्ये असलेले संजय पाटील हे ऐनवेळी भाजपमध्ये प्रवेश करून खासदार झाले. त्यानंतर २०१९ च्या निवडणुकीत तिरंगी लढत झाली. पूर्वाश्रमीचे भाजपचे असलेले गोपीचंद पडळकर यांनी ऐनवेळी वंचित बहुजन विकास आघाडीची उमेदवारी घेतली. कॉंग्रेसच्या मतात फूट पडल्याने त्यांना तीन लाखांहून अधिक मते मिळाली. त्यामुळे कॉंग्रेस आघाडीच्या पाठिंब्यावरील स्वाभिमानी पक्षाचे उमेदवार विशाल पाटील यांचा पराभव होऊन संजय पाटील हे दुस-यांदा भाजपचे खासदार झाले.