विधानसभेसाठी उमेदवारीसाठी चुरस पहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी पक्षांच्या बैठका, भेठीगाठी होत असल्याचे चित्र पहायला मिळतच आहे. इचलकरंजी विधानसभेची जागा आपल्याकडे ठेवण्यासाठी काँग्रेसच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत. शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष संजय कांबळे यांनी जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांची कोल्हापुरात भेट घेतली. याबाबत सविस्तर चर्चा करण्यासाठी त्यांनी उद्या मंगळवारी २ तारखेला मुंबईत येण्यास कांबळे यांना सांगितले आहे. या बैठकीत जागेसह काँग्रेसच्या संभाव्य उमेदवारीवर प्राथमिक चर्चा होण्याची शक्यता आहे. विद्यमान आमदार प्रकाश आवाडे यांच्याविरोधात प्रबळ उमेदवार ठरविण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत.
काही दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीस काही प्रमुख राजकीय नेतेमंडळी उपस्थित होती. त्यामध्ये संभाव्य उमेदवारीवर चर्चा झाली. त्यानंतर आता कांबळे यांनी आमदार पाटील यांची भेट घेऊन हालचालींना गती आली आहे. कांबळे हे स्वतः काँग्रेसकडून इच्छुक असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे त्यांच्या या भेटीला विशेष महत्त्व आहे. गतवेळी काँग्रेस आघाडीकडून राहुल खंजिरे रिंगणात होते. ही जागा काँग्रेसकडे राहणार की राष्ट्रवादी शरद पवारांकडे जाणार याबाबत उत्सुकता आहे.
सध्या महाविकास आघाडीसह अन्य घटक पक्षांकडून एकच उमेदवार देण्याबाबत विचार सुरू आहे. त्यामुळे उमेदवार निश्चीत झाल्यानंतर जागा कोणत्या पक्षाकडे जाणार हे ठरणार आहे. काँग्रेसकडून खंजिरे यांच्यासह प्रदेश सचिव शशांक बावचकर यांच्या नावाचीही चर्चा होऊ शकते.