मेडिकल,मोबाईल दुकानातून लाखोंचा मुद्देमाल लंपास!


इचलकरंजीत दिवसेंदिवस चोरीच्या घटनांत खूपच वाढ झालेली पहावयास मिळत आहे. बंद घरे देखील फोडून चोरटे आपले हात रिकामे करतात. कोल्हापूर रोडवरील मेडीकल आणि मोबाईल दुकानाच्या छताचा पत्रा उचकटून चोरट्यांनी ७० हजाराची रोकड आणि ३५ हजार १०० रुपयांचे मोबाईल दुकानातील साहित्य असा १ लाख ५ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. या प्रकरणी मन्सुरअली नबीलाल शेख (वय ३७ रा. गांधीविकास नगर गल्ली नं. २ कबनूर) यांनी शिवाजीनगर पोलिसात तक्रार दिली आहे.

याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, मन्सुरअली शेख यांच्या मालकीचे कोल्हापूर रोडवर एच. जी. एम. नांवाने मेडीकल दुकान आहे. दुकानातील विक्री माल तसेच खरेदी मालासाठीचे पैस ते मेडीकलमध्येच काऊंटर ड्रॉव्हरमध्ये ठेवतात.

याच मेडीकलसमोर वाहिद राजकुमार नाईकवडे यांचे आर. के. मोबाईल शॉपी दुकान आहे. हे दोघेही नेहमीप्रमाणे मंगळवारी रात्री दहा वाजता दुकाने बंद करुन गेले होते. मन्सुरअली शेख हे बुधवारी सकाळी नेहमीप्रमाणे मेडकील उघडून आत गेले असता त्यांना दुकानाच्या छताचा पत्रा उचकटण्यात आल्याचे निदर्शनास आले. तसेच दुकानातील साहित्य अस्ताव्यस्त टाकण्यात आल्याचे दिसले. तर काऊंटर ड्रॉव्हरमध्ये ठेवलेले ५३ हजाराची रोकड नसल्याचे निदर्शनास आले.

तर वाहिद नाईकवडे यांचे मोबाईल दुकानाच्या छताचा पत्रा उचकटून चोरट्यांनी दुकानातील १७ हजाराची रोकड आणि ३५ हजार १०० रुपयांची मोबाईल ॲक्सेसिरीज असा एकूण १ लाख ५ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेल्याचे निदर्शनास आले. या प्रकरणी मन्सुरअली शेख यांनी शिवाजीनगर पोलिसात चोरीची फिर्याद दिली आहे.