एकेकाळी मनसेचा बालेकिल्ला असलेल्या नाशिकमध्ये मनसेची स्थिती अत्यंत नाजूक झाली आहे. शहरात पक्षाला पुन्हा नवसंजीवनी देण्यासाठी मनसेकडून प्रयत्न सुरु आहेत. या पार्श्वभूमीवर मनसेने नाशिकला अठराव्या वर्धापन दिनाचामान दिल्याचे दिसून येत आहे. वर्धापन दिनाच्या माध्यमातून मनसे जोरदार शक्तीप्रदर्शन करणार असून पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे.
मनसे प्रमुख राज ठाकरेआगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शनिवारी वर्धापन दिनाच्या माध्यमातून कोणती भूमिका मांडणार? याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. आज दादासाहेब गायकवाड सभागृहात राज्यभरातील पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित असणार आहे. पुढच्या काही दिवसात लोकसभेची निवडणूक होत आहे. त्यामुळे मनसेच्या वर्धापन दिनाला महत्व आले आहे. मनसेकडून आगामी निवडणुका लढवण्याची घोषणा करण्याची शक्यता आहे. तसेच पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना राज ठाकरे कोणती नवी राजकीय भूमिका घेतात, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
आज राज ठाकरेंची तोफ नाशिकमधून धडाडणार असल्याने नाशिकच्या पदाधिकाऱ्यांमध्ये कमालीचा उत्साह दिसून येत आहे. मनसेने मुंबई व ठाणे यापेक्षा अधिक वेगाने नाशिकमध्ये पायमुळ रोवले. नाशिककरांनी सन २००९ च्या विधानसभा निवडणुकीत शहरातील चारपैकी तीन आमदार मनसेचे निवडून दिले होते. त्यानंतर २०१२ च्या मनपा निवडणुकीत पक्षाचे चाळीस नगरसेवक निवडून दिले. त्या जोरावर मनसेने नाशिकमध्ये पक्षाचा पहिला महापौर बसवला.