Solapur News : पेपर अवघड गेल्याने विद्यार्थिनीने संंपवले जीवन

बारावी विज्ञान शाखेचा पेपर अवघड गेल्याच्या नैराश्यातून धर्मपुरी (ता. माळशिरस) येथील किरण भाऊ पाटोळे (वय १७) हिने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.किरण पाटोळे ही नातेपुते येथील डॉ. बा.ज. दाते प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयात इयत्ता बारावीच्या विज्ञान शाखेत शिकत होती. नुकतीच बारावी विज्ञान शाखेची परीक्षा संपली होती. परीक्षा झाल्यापासून ती सतत उदास होती. ती सतत आपल्या आईला मला पेपर अवघड गेला असल्याचे सांगत होती.

गुरुवारी (ता. ७) सायंकाळी सात वाजता नेहमीप्रमाणे आपल्या भावंडाबरोबर ती गप्पा मारत बसली असता अचानक मला कपडे बदलायचे आहेत, असे सांगून घरामध्ये गेली. त्यानंतर आतमधून दरवाजा लावून घरातील लोखंडी अँगलला ओढणीच्या साह्याने तिने गळफास घेतला. बराच वेळ ती बाहेर न आल्याने खिडकीतून पाहिले असता तिने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे दिसून आले.

त्यानंतर घराचा दरवाजा तोडून तिला बाहेर काढण्यात आले. उपचारासाठी तिला नातेपुते येथील ग्रामीण रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. ही घटना समजताच परिसरातील नागरिकांनी गर्दी केली होती. शवविच्छेतदानंतर डॉ. नमता व्होरा यांनी गुरुवारी रात्री उशिरा साडेअकरा वाजता मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात दिला