पैसे, दारु वाहतुकीवर असणार 46 भरारी पथकांचे लक्ष!

निवडणुकीच्या काळात पैसा, दारूची अवैध वाहतूक होतेच, अशी आजवरील स्थिती आहे. अशा अवैध हालचालींवर वॉच ठेवून जिल्ह्यातून ये-जा करणाऱ्या प्रत्येक संशयास्पद वाहनांची तपासणी केली जाणार आहे.जिल्ह्याच्या सीमेवर नाकाबंदी असणार आहे. वाहनांची तपासणीसह इतर हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी ४६ भरारी पथकांची नेमणूक करण्यात आली आहे.

निवडणुकीवेळी मतदारांना कशाचेही प्रलोभन तथा आमिष दाखवू नये, तसे केल्यास संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याचे निवडणूक आयोगाचे आदेश आहेत. तरीही, अनेकदा रात्री-अपरात्री मतदारांना पैसा, दारू दिली जाते, असे यापूर्वीच्या निवडणुकांमधील कारवायातून दिसून येते. दुसरीकडे अनेकदा उमेदवारांकडून आचारसंहितेचा भंग केला जातो. त्या बाबींवर लक्ष ठेवण्याची जबाबदारी या भरारी पथकांवर असणार आहे.

निवडणूक काळात २४ तास ही पथके जिल्हाभर गस्त घालणार आहेत. वाहनांची तपासणी कशी करायची, त्यावेळी कोणती खबरदारी घ्यायची, आचारसंहितेचा भंग झाल्यास नेमकी काय करवाई करायची अशा बाबींची माहिती या पथकांमधील अधिकाऱ्यांना आज शनिवारी दिले जाणार आहे. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या उपस्थितीत हे प्रशिक्षण पार पडेल. पोलिस, राज्य उत्पादन शुल्क विभाग, महसूल अशा विविध विभागांचे अधिकारी यावेळी उपस्थित असणार आहेत.

लोकसभा निवडणुकीवेळी संशयास्पद वाहनांची तपासणी होते. पैसा, दारू यासह अन्य वस्तूंची अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई केली जाते. त्यासाठी यंदा ४६ भरारी पथके नेमली असून त्याचे आज (शनिवारी) प्रात्यक्षिक होणार आहे.

लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता पुढील आठवड्यात जाहीर होईल. निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर मतदानापूर्वी साधारणत: ३५ ते ४० दिवसांचा अवधी असतो. त्या काळात निवडणुकीसाठी नेमलेल्या २५ हजार कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण होईल. त्यामध्ये शिक्षकांसह इतर शासकीय विभागांमधील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. त्यांची यादी तयार असून निवडणूक जाहीर झाल्यावर त्या सर्वांना प्रशिक्षणासंदर्भातील माहिती कळविली जाणार आहे.