शेकापमधील खदखद चव्हाट्यावर…..

सांगोल्याच्या शेतकरी कामगार पक्षातील मतभेद पुन्हा एकादा चव्हाट्यावर आले आहेत. माजी आमदार (स्व.) गणपतराव देशमुख यांचे नातू तथा 2019 च्या विधानसभा निवडणुकीतील शेकापचे उमेदवार डॉ. अनिकेत देशमुख यांनी एका व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या मनातील खदखद व्यक्त केली आहे.

ही खदखद व्यक्त करताना डॉ. अनिकेत यांनी पक्षातील काही नेत्यांवर नाव न घेता जोरदार टीकास्त्र सोडले आहे. तसेच, येत्या सोमवारी (ता. 11 मार्च) होणाऱ्या शेकापच्या शेतकरी मेळाव्याला आपला पाठिंबा नाही, असेही डॉ. अनिकेत देशमुख यांनी स्पष्ट केले आहे, त्यामुळे शेकापमधील गटबाजी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे.

गणपतराव देशमुख यांनी सांगोला तालुका शेतकरी कामगार पक्षाचा बालेकिल्ला बनविला होता. गणपतराव देशमुख यांच्यानंतर या बालेकिल्ल्याला तडे जाताना दिसत आहेत. मागील विधानसभा निवडणुकीत शेकापकडून डॉ. अनिकेत देशमुख यांनी शिवसेनेचे शहाजी पाटील यांना निकराची झुंज दिली होती. त्या निवडणुकीत अनिकेत यांचा अल्पशा मतांनी पराभव झाला होता. पराभवानंतर डॉ. देशमुख हे आपल्या पुढील शिक्षणासाठी बाहेरगावी गेले होते. त्यामुळे ते मतदासंघातून काही दिवस दुरावले होते.

डॉ. अनिकेत देशमुख हे शिक्षणासाठी बाहेरगावी गेल्यानंतर गणपतआबांचे दुसरे नातू डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी वैद्यकीय क्षेत्र सोडून शेतकरी कामगार पक्षाच्या वाढीसाठी वेळ दिला. त्यांनी पक्षासाठी वेळ दिल्यामुळे संघटनेवर त्यांचे वर्चस्व असल्याचे दिसून येते. अनिकेत देशमुख हे शिक्षण पूर्ण केल्यानंतर सांगोल्याच्या राजकारणात सक्रिय झाले आहेत. दोन्ही डॉक्टर बंधूंमध्ये आलबेल असल्याचे दिसून येत नाही. मात्र, दोघेही स्वतंत्रपणे आपली वाटचाल करत आहेत, त्यांचे कार्यकर्तेही आपलाच नेता विधानसभा लढविणार असल्याचे ठासून सांगत आहेत, त्यामुळे शेकापमधील अंतर्गत संघर्षही पुढे येताना दिसत आहे.