सांगलीत येत्या शनिवारी मेळावा

शक्तिपीठ महामार्गावर हरकती घेण्यासाठी २१ दिवसांची मुदत देण्यात आली आहे. महामार्गाची अधिसूचना राजपत्रात प्रसिद्ध झाल्यापासून म्हणजे ७ मार्चपासून २८ मार्चपर्यंत हरकती दाखल करता येणार आहेत.८०३ किलोमीटर लांबीच्या प्रस्तावित शक्तिपीठ महामार्गाला सर्व म्हणजे १२ जिल्ह्यांतून तीव्र विरोध होऊ लागला आहे.

बैठका, मेळावे यातून शेतकरी विरोध दर्शवत आहेत. आता रीतसर हरकतींमुळे या विरोधाला कायदेशीर रूप येऊ पाहत आहे. शासनाने जारी केलेल्या अधिसूचनेत हरकतींसाठी २१ दिवसांची मुदत देण्यात आली आहे.

हे राजपत्र ७ मार्च रोजी जारी करण्यात आले असून २८ मार्चपर्यंत हरकती नोंदवता येतील. महामार्गबाधित शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष दिगंबर कांबळे यांनी सांगितले की, भूसंपादन अधिकारी या नात्याने मिरज आणि आटपाडीच्या प्रांताधिकाऱ्यांकडे शेतकऱ्यांनी हरकती दाखल कराव्यात. आम्ही सोमवारी (दि. १८) एकत्रित हरकती दाखल करणार आहोत.

दरम्यान, सांगलीत येत्या शनिवारी (दि. २३) शक्तिपीठ महामार्गबाधित शेतकऱ्यांचा मेळावा आयोजित केला आहे. सांगलीवाडीत जुन्या पथकर नाक्याजवळील फल्ले मंगल कार्यालयाजवळ दुपारी एक वाजता मेळावा होईल. आमदार सतेज ऊर्फ बंटी पाटील, माजी खासदार राजू शेट्टी, डॉ. अजित नवले मार्गदर्शन करणार आहेत.