‘महाराष्ट्र केसरी’ स्पर्धेचा वाद मिटविण्यासाठी डबल महाराष्ट्र केसरी मल्ल चंद्रहार पाटील यांनी पुढाकार घेतला आहे. महाराष्ट्र केसरीचा विजेता मल्ल पृथ्वीराज मोहोळ व उपविजेता मल्ल शिवराज राक्षे या दोघांनी पुन्हा एकदा लढण्यासाठी तयार असल्याचे सांगितले आहे. या पार्श्वभूमीवर पै. चंद्रहार पाटील यांनी ही स्पर्धा लवकरच सांगली येथे घेणार असून या दोघांत पुन्हा कुस्ती लावून ‘महाराष्ट्र केसरी’चा सुरू असलेला वाद सांगलीत मिटविणार असल्याचे जाहीर केले आहे.
या दोन्ही मल्लांना प्रत्येकी २५ लाख रुपयांचे बक्षीस देण्याचे त्यांनी जाहीर केले आहे. महाराष्ट्र केसरीची स्पर्धेत पंचानी चुकीचा निर्णय दिल्याचा आरोप करत संतप्त शिवराज राक्षे याने पंचाला लाथ मारली. या प्रकारानंतर डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी राक्षेच्या कृतीचे समर्थन करीत पंचाला गोळ्या घातल्या पाहिजेत, असे विधान करीत महाराष्ट्र केसरीच्या दोन्ही गदा मी परत करणार असल्याचे जाहीर केले.
दरम्यान महाराष्ट्र केसरी मल्ल पृथ्वीराज मोहोळ याने पै. शिवराज राक्षे याच्यासोबत पुन्हा एकदा कुस्तीची लढत द्यावी, अशी मागणी होऊ लागली. यावर दोघांनीही महाराष्ट्र केसरीसाठी पुन्हा लढण्यास तयार असल्याचे सांगितले. त्यामुळे डबल महाराष्ट्र केसरी पै. चंद्रहार पाटील यांनी या दोन्ही मल्लांची सांगलीत कुस्ती लावण्याची तयारी केली आहे.
