इचलकरंजीत आज भव्य निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान….

शिवसेना कोल्हापूर जिल्हाध्यक्ष रविंद्र माने यांचा वाढदिवस नुकताच साजरा करण्यात आला. यांच्या वाढदिवसानिमित्त कोल्हापूर जिल्हा व शहर राष्ट्रीय तालीम संघ तसेच इचलकरंजी शहर तालीम संघाच्या मान्यतेने आज रविवार दि. १७ रोजी व्यंकोबा मैदान येथे भव्य निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान आयोजित करण्यात आले आहे. या मैदानात प्रथमच सहा महाराष्ट्र केसरी पैलवानांच्या अव्वल लढती होणार असल्याची माहिती नियोजन समितीचे सदस्य पै.अमृता भोसले यांनी दिली.

या मैदानास प्रमुख पाहुणे म्हणून शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर, पालकमंत्री हसन मुश्रीफ, माजी खास. कल्लाप्पाण्णा आवाडे, राज्य नियोजन आयोगाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, खास. धनंजय महाडिक, आम. सतेज पाटील, आम. राजूबाबा आवळे, आम. प्रकाश आवाडे, माजी आम. सुरेशराव हाळवणकर यांचेसह अनेक मान्यवर उपस्थित रहाणार आहेत.
पहिल्या क्रमांकाची कुस्ती भारत केसरी पै. सिकंदर शेख विरूध्द हरियाणाचा पै. मनजीतसिंग यांच्यात होत आहे.

दुसरी कुस्ती महाराष्ट्र केसरी पै. शिवराज राक्षे विरूद्ध पै. विकास काला (हरियाणा), तिसरी कुस्ती महाराष्ट्र केसरी पै.बाला रफिक विरूध्द महाराष्ट्र केसरी पै. हर्षवर्धन सदगीर (पुणे), चौथी कुस्ती महाराष्ट्र केसरी पै.पृथ्वीराज पाटील विरूध्द उत्तर महाराष्ट्र केसरी पै. योगेश पवार (अहमदनगर) पाचवी कुस्ती महापौर केसरी पै. कौस्तुभ डाफळे विरूध्द पै. संदिप मोटे, सहावी कुस्ती पै. श्रीमंत भोसले विरूध्द पै. सागर काळेबाग (सांगली), सातवी कुस्ती पै. प्रशांत जगताप विरूध्द पै. बाळू अपराध तर आठवी कुस्ती महिलांची होणार आहे. यामध्ये महाराष्ट्र केसरी पै. अमृता पुजारी विरूध्द पै. ऋतुजा जाधव यांच्यात लढत होणार आहे. या प्रमुख कुस्त्यांबरोबरच लहान- मोठ्या अशा सुमारे १२२ कुस्त्या होणार आहेत.