आरफळ कालव्यातील पाणी प्रश्नी शेतकऱ्यांनी केली ‘ही’ महत्वाची मागणी

सांगली जिल्ह्यातील कडेगाव, पलूस, विटा, आटपाडी आणि सातारा जिल्ह्यातील सातारा, कोरेगाव आणि कराड या तालुक्यांतील हजारो हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आणणारा आरफळ कॅनॉल १९९० पासून वाहत आहे.कॅनॉलसाठी कण्हेर धरणातून ३.७५ टीएमसी पाणी आरक्षित करण्यात आले आहे.

मात्र, आरफळ कॅनॉलवर अवलंबून असणारी सांगली जिल्ह्यासह कराड तालुक्यातील २० हजार हेक्टर शेतीतील पिके पाण्याअभावी तहानलेली आहेत. आरफळ कालव्यातून शेतीला पाणी द्यावे, अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात आली आहे.

मात्र, याकडे पाटबंधारे विभागाकडून दुर्लक्ष केले जात असल्याने शेतकरी आक्रमक झाले आहेत.आरफळचे एखादे गेट उघडून केवळ १५० क्युसेक इतकाच विसर्ग पुढे जात असल्यामुळे कमी दबावाने पाणी पुढे जात नसल्याचे दिसून आले. कोंबडवाडी योजना सुरू झाल्यानंतर आरफळच्या पाणी नियोजनाकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे.

मात्र, नवीन प्रस्तावित रोटेशननुसार पुढील काळात कराडला दि. २२ एप्रिलला, तर सांगलीला दि. ७ एप्रिलला पाणी सोडले जाईल. आवश्यकता असताना आरफळ कालव्यातून पाणी का सोडले जात नाही?, असा प्रश्न शेतकऱ्यांतून उपस्थित केला जात आहे.