चक्क सोन्याच्या वस्तऱ्याने दाढी! आठ तोळ्याचा वस्तरा

सोन्याचे भाव गगनाला भिडले असताना सर्वसामान्य आणि शेतकऱ्याच्या आवाक्या बाहेर सोने गेले आहे. पण त्यांची सोन्याच्या वस्तराने दाढी व्हावी आणि त्यांना आनंद मिळावा; या हेतूने सोन्याच्या वस्तराने दाढी केली जात आहे.सांगलीच्या रिळ्यातील नाभिक व्यावसायिक देसाई बंधूंनी हा अनोखा उपक्रम केला आहे. रिळेसारख्या ग्रामीण भागात हा आठ तोळ्याचा सोन्याचा (Gold) वस्तरा पाहण्यासाठी आणि दाढी करण्यासाठी ग्राहकाची रीघ लागली आहे.

सोन्यासारख्या ग्राहकांची सेवा सोन्याच्या वस्ताऱ्याने करण्याचे ब्रीद घेऊन हे बंधू काम करत आहेत. सांगली जिल्ह्यातील शिराळा (Shirala) तालुक्यातील रिळे या ग्रामीण भागातील नाभिक समाजातील अशोक शंकर देसाई यांचे वडीलोपार्जित केसकर्तनालयाचे दुकान गेली अनेक दशके सुरू आहे. वडिलांनी सर्व आयुष्य या व्यवसायासाठी समर्पित केले आहे. कौटुंबिक परिस्थिती तशी बेताचीच.

अशोक देसाई यांनी पत्नीच्या समर्थ साथ व अमोल आणि प्रदीप ही दोन मुलेही नाभिक व्यवसायाकडे वळले. जेमतेम शिक्षण असणारा थोरला मुलगा अमोल आणि धाकटा मुलगा प्रदीप गेल्या पंधरा- वीस वर्षापासून नाभिक व्यवसायात कार्यरत आहेत. प्रामाणिक व्यवसाय आणि तत्पर सेवा यामुळे तालुक्यातील ग्राहकांचा या दुकानात ओढा आहे. माफक दरामध्ये सेवा देण्यासाठी हे दुकान प्रसिद्ध आहे. या व्यवसायाबरोबर सामाजिक कामामध्येही सहभाग असतो.