आटपाडी नगरपंचायत स्थापन झाल्यापासून प्रथमच पाणीपुरवठा योजनेसाठी मोठा निधी मिळवण्यात नगरपंचायतला यश आले आहे. आटपाडी नगरपंचायत क्षेत्रातील पिण्याच्या पाणीपुरवठा योजनेसाठी राज्य शासनाकडून नगरोत्थान महाअभियाना अंतर्गत ८३ कोटी ८२ लाख रुपये मंजूर झाले असून, या कामामुळे आटपाडी शहराचा पाणीप्रश्न कायमचा निकालात निघणार आहे. अनिल बाबर यांनी आटपाडी तालुक्यातील डोंगरी भागातील गावांचा समावेश डोंगरी विकास योजनेत व्हावा, यासाठी पाठपुरावा केला होता. याबाबतही शासनाने अध्यादेश काढला आहे.
योजना पूर्ण झाल्यानंतर आटपाडीच्या नागरिकांना दररोज शुद्ध पाणी पिण्यास मिळणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुहास बाबर, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अमरसिंह देशमुख व जिल्हा बँकेचे संचालक तानाजी पाटील परिषदेचे माजी अध्यक्ष अमरसिंह देशमुख, जिल्हा बँकेचे संचालक तानाजी पाटील यांनी संयुक्त पत्रकार बैठकीत दिली. यावेळी सुहास बाबर म्हणाले, पुढील पंधरा ते वीस वर्षांच्या लोकसंख्या वाढीचा विचार करूनच ही योजना तयार करण्यात आली आहे. यामध्ये नव्याने गळवे वस्ती, तकाची खडी, आयटीआय कॉलेज, लघुपाटबंधारे विभाग येथे प्रत्येकी एक टाकी व न्यायालय परिसरात दोन टाक्या करण्यात येणार आहेत. यामध्ये २८४ किलोमीटरच्या जलवाहिन्या, काँक्रीटचे रस्ते, १२० ‘केडब्लूपी’चे सोलर पॉवर प्लांट उभारण्यात येणार आहे. जलवाहिन्यांची कामे करताना रस्ते किंवा अन्य नुकसान होत असल्यास ही कामे नव्याने करण्यासाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे.