इचलकरंजीत खाजगी सावकार प्रकरणी गुन्हा दाखल!

व्याजासह मुद्दल देऊनही सतत पैशासाठी तगादा लावून जीवे मारण्याची तसेच खोटी केस दाखल करुन रस्त्यावर आणण्याची धमकी दिल्याप्रकरणी दोन महिलांच्या विरोधात बेकायदेशीरपणे खाजगी सावकारी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. सुनिता नेमिनाथ भबीरे आणि ज्योत्सना विनोद पाटील ( रा. आयजीएम हॉस्पीटलजवळ, इचलकरंजी) अशी त्यांनी नांवे
आहेत. या प्रकरणी उपनिबंधक सहकारी संस्था हातकणंगलेचे मुख्य लिपीक फिरोज दस्तगीर जमादार (वय ५३, रा. कोल्हापूर) यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी कि, संजयकुमार रायगोंडा सांगले (रा. दानोळी, ता. शिरोळ) यांनी मुलीच्या लग्नासाठी सुनिता भबीरे आणि ज्योत्सना पाटील यांच्याकडून २ लाख ३० हजार रुपये ४ टक्के व्याजाने घेतले होते. सांगले यांनी वेळोवेळी व्याज आणि मुद्दलापोटी ३ लाख ५० रुपये त्यांच्या बँक खात्यावर पाठवले होते. त्यानंतरही साडेतीन लाख रुपये बाकी असल्याचे सांगत त्या दोघींनी वसुलीसाठी सांगले यांचेकडे तगादा लावल्याने परत त्यांना व्याजही दिले. तरीही वसुलीसाठी दोघी तगादा लावत ६ महिन्यांसून तुला जिवंत सोडत नाही, खोट्या केसेस दाखल करुन तुझे आयुष्य उद्ध्वस्त करतो अशा धमक्या देत आहेत.
त्यामुळे त्यांच्या त्रासाला कंटाळून सांगले यांनी सहाय्यक निबंधक सहकारी संस्था शिरोळ यांच्याकडे धाव घेतली होती.

सांगले यांच्या तक्रारीची दखल घेत सहाय्यक निबंधकांनी भबीरे आणि पाटील यांची चौकशी करुन त्याबाबतचा अहवाल जिल्हा उपनिबंधकांकडे पाठवला. जिल्हा उपनिबंधकांनी दिलेल्या घर झडतीच्या आदेशानुसार फिरोज जमादार यांच्या नेतृत्वाखालील पथकाने भबीरे आणि पाटील यांच्या घराची झडती घेतली असता विविध व्यक्तींचे वेगवेगळ्या बँकांचे स्वाक्षरी असलेले ८ धनादेश त्याचबरोबर नोंदवह्या असे साहित्य मिळून आले. त्यामुळे त्या दोघींच्या विरोधात जमदार यांच्या फिर्यादीनुसार शिवाजीनगर पोलीस ठाण्यात खाजगी सावकार प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.