सुहास बाबर यांच्या पाठपुराव्याला अखेर यश!

खानापूर येथे बँका, दवाखाने, मेडिकल, शाळा याची संख्या मोठी असल्याने परिसरातील २० ते २२ गावांतील लोकांची व विद्यार्थ्यांची या ठिकाणी नेहमी वर्दळ असते. सततच्या रहदारीमुळे या परिसरामधील खानापूर, भिवघाट, तामखडी या परिसरातील महामार्गावर अपघातांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. रुग्णांना अपघात झाल्यानंतर योग्य उपचार मिळण्यासाठी विटा किंवा तासगाव येथील रुग्णालयात दाखल करावे लागते या गोष्टीला विलंब होत असल्याने रुग्णांच्या नातेवाइकांना त्रास सहन करावा लागत आहे.

हा त्रास थांबवण्यासाठी व रुग्णांना वेळेत योग्य उपचार मिळण्यासाठी खानापूर येथे ट्रामा केअर सेंटर उभारावे, अशी मागणी घाटमाथ्याचे नेते राजाभाऊ शिंदे व अनिल शिंदे यांनी आ. अनिलभाऊ बाबर यांच्याकडे केली होती. त्यांच्या निधनानंतर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुहास बाबर यांनी या ट्रामा केअर सेंटरबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पत्र व्यवहार करून पाठपुरावा केला होता. या पाठपुराव्याला यश आले असून सांगली जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये खानापूर येथे ट्रामा केअर सेंटर बांधण्यासाठी मंजुरी दिली आहे.

खानापूर जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या सभेत खानापूर येथे ट्रामा केअर सेंटरच्या बांधकामास मंजुरी दिली. विजापूर गुहागर महामार्गावर असलेले खानापूर हे घाटमाथ्यावरील मुख्य व्यापारी केंद्र आहे.