इस्रायल-हमास युद्धाचा भडका, भारतावर थेट होणार परिणाम

गेल्या सात दिवसांपासून इस्रायल आणि हमास यांच्यात सुरू असलेल्या युद्धाचे परिणाम आता दिसू लागले आहेत. हे परिणाम भूराजकीय, आर्थिक, तसेच मालहाताळणीसंदर्भात दिसून येऊ लागले आहेत. भारतीय अर्थव्य़वस्था आणि भांडवल बाजार यांच्यावर मात्र या परिस्थितीचा अद्याप मोठा परिणाम झालेला नाही. तरीही सजग गुंतवणूकदार म्हणून सतर्क राहून योग्य भांडवली मत्तांमध्ये दीर्घकालीन गुंतवणूक करणे श्रेयस्कर असल्याचे बाजार तज्ज्ञांचे म्हणणे आहे….

– तेलाचा दर: आखाती देशांकडून जगभरातील खनिज तेलाच्या पुरवठ्यापैकी एक तृतीयांश पुरवठा केला जातो. गेल्या सात दिवसांत कच्च्या खनिज तेलाचा दर वाढला आहे. हे युद्ध लांबल्यास इराणसारख्या तेल उत्पादक देशाला याची झळ बसल्यास जगासमोर तेल संकट निर्माण होऊ शकते.

– चलनवाढ: तेलाचा दर वाढत चालल्यामुळे जगभरात चलनवाढ होण्याचा धोका आहे. अमेरिका, भारत आणि चीन या खनिज तेलाच्या बड्या आयातदार देशांपुढे चलनवाढीचा धोका निर्माण होऊ शकतो.

– व्याजदर: अनेक देशांच्या मध्यवर्ती बँकांकडून चलनवाढ आटोक्यात ठेवण्यासाठी व्याजदरात वाढ केली जाऊ शकेल.

भारत-इस्रायल व्यापार

– निर्यात: भारतातून इस्रायला प्राधान्याने पेट्रोलियम उत्पादने निर्यात केली जातात. ही उत्पादने एकूण निर्यातीच्या १.८ टक्के आहेत. युद्धामुळे या उत्पादनांच्या पुरवठ्यावर परिणाम होईल.

– आयात: यंत्रे, मोती, हिरे आणि रत्ने यांची आयात भारत इस्रायलमधून करतो. यामध्ये अनियमितता येऊ शकेल.

– चलनाचा परिणाम: रुपया आणखी घसरण्याची भीती आहे.