उद्धव ठाकरेंचा आज सांगली दौरा!

सांगली लोकसभेच्या जागेवरून ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये रस्सीखेच सुरु असतानाच, उद्धव ठाकरेंची सांगली जिल्ह्यातील मिरजेत आज जनसंवाद सभा आयोजित करण्यात आली आहे. त्यामुळे सांगली लोकसभेचा उमेदवार म्हणून चंद्रहार पाटील यांच्या नावाची ठाकरे घोषणा करणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत. विशेष म्हणजे याच मतदारसंघावर काँग्रेसकडून देखील दावा केला असून, विशाल पाटील यांच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यानंतर सांगली लोकसभेवरून सुरू असलेल्या राजकीय कलगीतुरा थांबवणार की, आणखी सस्पेन्स वाढणार हे पाहणे महत्वाचे असणार आहे.  

उद्धव ठाकरे आज शिवसेनेच्या जन संवाद सभेच्या निमित्ताने सांगली दौऱ्यावर येत आहेत. मिरजेत सायंकाळी 5 वाजता त्यांची सभा पार पडणार आहे. या मेळाव्यात सांगली लोकसभेची अधिकृत उमेदवारी ठाकरेंकडून चंद्रहार पाटील यांना जाहीर होणार का? याकडे लक्ष असणार आहे. दुसरीकडे सांगली जिल्ह्यातील काँग्रेस नेते आणि काँग्रेसचे संभाव्य उमेदवार विशाल पाटील मागील 4 दिवसापासून मुंबईत ठाण मांडुन आहेत. काँग्रेसचे नेतेही सांगली लोकसभेची जागा काँग्रेसकडेच राहील यावर ठाम असून, काँगेसकडून उमेदवारी बाबतचा अंतिम निर्णय आज घेतला जाऊ शकतो. 

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांच्याकडून राज्याचा दौरा केला जात असून, ठाकरे महाराष्ट्र पिंजून काढत आहेत. ठिकठिकाणी त्यांच्या जनसंवाद सभा देखील होतांना पाहायला मिळत आहे. अशात आज उद्धव ठाकरे सांगली  जिल्ह्याचा दौरा करणार असून, मिरजेमध्ये जाहीर सभा देखील घेणार आहेत. यापूर्वी काही सभांमध्ये त्यात्या मतदारसंघातील उमेदवारांची घोषणा ठाकरेंनी अप्रत्यक्षपणे केल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे आजच्या सभेत ठाकरे गटाकडून इच्छुक असलेले चंद्रहार पाटील यांच्या उमेदवारीवर उद्धव ठाकरे शिक्कामोर्तब करणार का? हे पाहणे महत्वाचे असणार आहे.