बनावट नंबर प्लेटच्या टेम्पो ट्रॅव्हलर्सवर कारवाई

कर्नाटक नोंदणीची बनावट नंबरप्लेट लावण्यात आलेली टेम्पो ट्रॅव्हलर्स अब्दुललाट (ता. शिरोळ) येथून कारवाई करत ताब्यात घेण्यात आली. या वाहनाच्या मालकांचा शोध घेण्यासह कागदपत्रे तपासणीचे काम सुरु आहे. इचलकरंजी उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून ही कारवाई करण्यात आली. याबाबत मिळालेली माहिती अशी, अब्दुललाट येथे एका मंदिरालगत बनावट नंबरप्लेट लावण्यात आलेली टेम्पो ट्रॅव्हलर्स असल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील मोटरवाहन निरिक्षक किरण खोत यांना मिळाली होती. तात्काळ त्यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली.

त्यावेळी सदरचे वाहन मिळून आले. मात्र, त्या वाहनाच्या मालकाचा शोध लागला नाही. सदरचे वाहन ताब्यात घेण्यात आले असून चौकशी सुरु आहे. कर चुकविण्यासाठी कर्नाटकातील क्रमांक लावण्यात आला असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. वाहनाची नोंदणी, मूळ नंबरप्लेट, चेस नंबर आदीचा तपास करुन मालकाचा शोध घेतला जात आहे. ही कारवाई सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय इंगवले यांच्या मार्गदर्शनाखाली मोटरवाहन निरिक्षक किरण खोत, सहा. निरिक्षक गणपतराव माशाळकर, नितीन देसाई आदींनी केली.