आयजीएम रुग्णालयातील नव्या जागेत कार्यालय सुरू…

आयजीएम रुग्णालयाच्या कार्यालयाचे कामकाज अनेक वर्षापासून एका वॉर्डच्या जागेत सुरू होते. अखेर फर्निचरचे काम पूर्ण झाल्याने कार्यालय नूतन जागेत स्थलांतरित केले. कार्यालयाने वॉर्डाची जागा अडवून धरल्याने रुग्णालयात रुग्ण दाखल करण्यात मर्यादा येत होत्या. सध्या हा वॉर्ड रिकामा झाला असून लवकरच आंतररुग्णांसाठी उपलब्ध करण्यात येत असल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.

दरम्यान, काही राजकीय नेत्यांच्या कार्यकर्त्यांनी संबंधित मक्तेदारासोबत टक्केवारीची मागणी केल्याने कार्यालयाचे काम रेंगाळल्याचे बोलले जात होते. त्यामुळे कार्यालयाचे काम कधी पूर्ण होणार याची प्रतीक्षा कर्मचाऱ्यांना लागली होती.रुग्णालयामधील लेखाविभाग, भंडार विभाग, रुग्ण कल्याण समिती आदी आस्थापणांचे कार्य कार्यालयातून होत असल्याने वॉर्डमधील जागा अपुरी पडत होती.

यामुळे रुग्णालय प्रशासनाकडून वरिष्ठ कार्यालयाकडे वारंवार फर्निचर करून देण्याची मागणी करण्यात येत होती. त्या अनुषंगाने सार्वजनिक बांधकाम विभागाकडून कार्यालयाच्या फर्निचरसाठी सुमारे ३४ लाख ६१ हजार रुपयांचे अंदाजपत्रक निश्‍चित केले होते. त्यामधून सुसज्ज कार्यालय केले आहे.