माजी खासदार श्रीमती निवेदिता माने यांनी दिली इचलकरंजीस भेट!

माजी खासदार निवेदिता माने यांनी आज इचलकरंजीत भाजपच्या नेतेमंडळींबरोबर संवाद साधला.यातील बहुतांश पूर्वाश्रमीचे माने गटाचे समर्थक आहेत. धैर्यशील माने यांना पुन्हा एकदा खासदार करण्यासाठी कामाला लागा, असा संदेश माने यांनी यावेळी दिला. महायुतीकडून पुन्हा एकदा धैर्यशील माने यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.

त्या पार्श्वभूमीवर निवेदिता माने यांनी माजी उपनगराध्यक्ष उदय बुगड यांच्या निवासस्थानी भेट दिली. घरगुती कार्यक्रमानिमित्त त्यांनी ही भेट दिल्याचे सांगण्यात आले. यावेळी भाजपचे प्रमुख नेतेमंडळी उपस्थित होती. त्यांच्याशी माने यांनी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने संवाद साधला.

धैर्यशील माने यांना पुन्हा एकदा खासदार करण्यासाठी यंत्रणा गतिमान करा, असे त्यांनी सर्वांना सांगितले. याप्रसंगी वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष अशोक स्वामी, माजी उपनगराध्यक्ष तानाजी पोवार, अजितमामा जाधव, सुनील महाजन, दिलीप मुथा, अशोक पाटील, अनिल डाळ्या, जयेश बुगड आदी उपस्थित होते.