Salman Khan: सलमानला धमकी; बिष्णोईला कर्नाटकमधून अटक, मुंबई पोलिसांची कारवाई

अभिनेता सलमान खानला धमकी देणाऱ्या भिकाराम बिष्णोई ऊर्फ विक्रम या व्यक्तीस वरळी पोलिसांनी बुधवारी (ता. ६) कर्नाटक येथून अटक केली. सलमानने समाजभावना दुखावल्याच्या व्यथेतून हे कृत्य केल्याची माहिती आरोपीने प्राथमिक चौकशीत दिल्याचे पोलिसांनी सांगितले.आरोपीस मुंबईत आणल्यानंतर त्याचा कुख्यात लॉरेन्स बिश्र्नोईशी संबंध आहे का, हे तपासले जाणार आहे, असेही पोलिसांनी स्पष्ट केले.

सोमवारी या व्यक्तीने वाहतूक पोलिसांच्या नियंत्रण कक्षातील हेल्पलाईन क्रमांकावर संदेश पाठवून सलमानला धमकावले होते.मी लॉरेन्सचा भाऊ बोलत असून जिवंत राहायचे असेल तर सलमानने आमच्या मंदिरात जाऊन माफी मागावी किंवा पाच कोटी रुपये द्यावे, तसे न केल्यास सलमानला ठार मारू, असे त्याच्या संदेशात नमूद होते. याप्रकरणी वरळी पोलिसांनी तांत्रिक तपसाआधारे या व्यक्तीस अटक केली.