धुळवडीला रंग आणि पाण्यापासून स्मार्टफोनला वाचवा

भारतात होळी आणि राज्यात रंगपंचमीची तयारी अंतिम टप्प्यात आहे. पण या रंगोत्सवाला नुकसानीचे गालबोट लागायला नको. पाणी आणि रंगांच्या विना धुळवडीची कोणी कल्पना तरी करु शकतं का? पण या दोन्ही वस्तू तुमच्या इलेक्ट्रॉनिक गझेट्ससाठी सर्वात हानीकारक ठरतात. ईअरफोन वा स्मार्टवॉच घालून तुम्ही रंगपंचमी साजरी करायला जात असाल तर नुकसान होणारच. तुमचा मोबाईल पाण्यात भिजला तर रंगोत्सवाच्या आनंदावर विरजण पडेल. तेव्हा या टिप्स तुमच्या उपयोगी ठरतील.

जर तुमचा मोबाईल भीजला अथवा रंगाचे पाणी गेल्यास, सर्वात अगोदर तो फोन स्विच ऑफ करा. त्यानंतर फोनला एका स्वच्छ कपड्याने पुसा. या फोनमध्ये सिम कार्ड ट्रे बाहेर काढा. जर बॅक पॅनल उघडता येत असेल तर ते बाहेर काढा. पण आता अनेक फोन हे नॉन-रिमुव्हएबल बॅक पॅनलचेच येत आहेत. फोन स्वच्छ करताना कोणत्याही अणकुचीदार वस्तूचा वापर करु नका.

फोन पाण्यात भिजला असेल तर हळूच त्यावर चापटी मारुन पाणी बाहेर काढण्याचा प्रयत्न करा. फोनला स्वच्छ केल्यानंतर तो उघड्यावर कोरडा होण्यासाठी तसाच राहू द्या. फोन कोरडा करण्यासाठी हेअर ड्रायर अथवा तांदळाचा बिलकूल वापर करु का. तांदळाच्या डब्यात फोन ठेवल्यास काही दाणे त्याच्या आत फसून फोन खराब होण्याची भीती असते

मोबाईलला पाण्यापासून कसे वाचवणार

  1. झिप लॉक बॅग अथवा स्क्रीन प्रोटेक्टर : फोनला पाण्यापासून वाचविण्यासाठी वॉटरप्रुफ झिप लॉक पाऊचचा वापर करणे फायदेशीर ठरेल. याशिवाय तुम्ही टेंम्पर्ड ग्लास वा प्लास्टिक स्क्रीन गार्डचा वापर करु शकता. त्यामुळे तुम्ही ओले हात लावले तरी तुमच्या फोनचे कुठलेच नुकसान होणार नाही.
  2. पारदर्शक टेप : बाजारात अगदी पातळ पारदर्शक टेप उपलब्ध आहेत. त्याचा तुम्ही वापर करु शकता. पण टेप लावण्यापूर्वी त्यावर अधिक गोंद नसावे याची खात्री करुन घ्या. कारण एकदा टेप चिकटल्यावर तुमच्या स्पीकर अथवा माईकवर गोंद चिकटल्यास तो काढणे जिकरीचे काम होईल.
  3. वॉटरप्रुफ मोबाईल कव्हर : बाजारात वॉटरप्रुफ मोबाईल कव्हर सहज मिळते. रंगोत्सवत रंग आणि पाण्यापासून मोबाईलची सुरक्षा करण्यासाठी हे कव्हर उपयोगी ठरेल. वॉटरप्रुफ असल्याने पाणी मोबाईलमध्ये जाऊ शकत नाही.