विकासासाठी सुरु असलेल्या 73 कोटीच्या आराखड्यातील कामे वेगाने सुरु असून विठ्ठल मंदिराला पुरातन 700 वर्षापूर्वीचे रूप येऊ लागले आहे. सध्या विठ्ठल आणि रुक्मिणी मातेच्या गर्भगृहातील ग्रॅनाईट फरशी, फ्लोरिंग काढून टाकायचे काम अंतिम टप्प्यात असून संपूर्ण मंदिराला पुरातन काळातील दगडी फ्लोरिंग बसविण्यात येत आहे. मंदिरातील नंतरच्या काळात बसविण्यात आलेले मार्बल, ग्रॅनाईट आणि याच पद्धतीच्या चकचकीत फारशा काढून टाकण्यात येत असल्याने खऱ्या अर्थाने मंदिरातील पुरातन असणारा दगड आता मोकळा श्वास घेऊ लागला आहे. विठ्ठल गाभाऱ्यात बसवलेल्या या ग्रेनाईटमुळे दगडांचे श्वसन थांबलं होतं. यामुळे गाभाऱ्यात खूप मोठ्या प्रमाणात दमटपणा राहत असल्याने याचा त्रास भाविकांना तर होताच होता, शिवाय देवाच्या मूर्तीवर देखील याचा विपरीत परिणाम जाणवत होता. एबीपी माझाच्या दणक्यानंतर पुरातत्व विभागाने तातडीने या फारशा हटविण्याच्या सूचना दिल्या आणि आता या 73 कोटीच्या आराखड्यात हे काम पहिल्या टप्प्यात वेगाने सुरु आहे.
सध्या विठ्ठल मंदिरातील सोळखांबी, चौखांबी आणि गाभारा तसेच रुक्मिणी मातेचा गाभारा येथे पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली हे काम सुरु आहे. या भागात असणारे दगडी खांब पुरातत्व विभाग शास्त्रोक्त पद्धतीने साफ करीत असल्याने या नक्षीदार खांब, छत आणि फ्लोरिंग याचे मूळ दगडी आकर्षक वैभव दिसू लागलं आहे. विठ्ठल मंदिरातील दगडांवर अत्यंत सुंदर नक्षीकाम आता अतिशय आकर्षकरीतीने समोर येऊ लागले असून मंदिरातील जुने दगडी फ्लोरिंग बाहेर येताच शेकडो वर्षांपूर्वी लोकांनी त्यावर लिहिलेला मजकूर दिसू लागला आहे. आता पुरातत्व विभाग हे मजकूर नोंदवण्याचे काम करणार असून मंदिराच्या इतिहासाची मोठी माहिती यामुळे समोर येऊ शकणार आहे.