शिंदे गटाचे नेते शिवाजीराव आढळराव पाटील हे शिवसेनेमधून आज राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश घेणार आहेत. आढळराव पाटील राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून (Shirur Lok Sabha Constituency) शिरुर लोकसभा मतदार संघाचे उमेदवार (Lok Sabha Election 2024) असतील. त्यामुळे शिरुरमध्ये पुन्हा एकदा आढळराव पाटील विरुद्ध अमोल कोल्हे अशी लढत बघायला मिळणार आहे. आज (26 मार्च)संध्याकाळी चार वाजता मंचरच्या शिवगिरी मंगल कार्यालयात अजित पवार, दिलीप वळसे पाटील, आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या उपस्थितीत शिवाजीराव आढळराव पाटलांचा पक्षप्रवेश होणार आहे.
मागील काही दिवसांपासून शिरुर लोकसभा मतदार संघातील उमेदवार कोण असेल याच्या चर्चा रंगल्या होत्या. त्यातच आता अमोल कोल्हेंविरोधात आढळराव पाटील राष्ट्रवादीकडून मैदानात उतरणार आहेत. अजित पवार स्वत: आढळराव पाटलांच्या हाती घड्याळ बांधणार आहे. त्यामुळे शिरुरमध्ये शरद पवार गट विरुद्ध अजित पवार गट उभा ठाकणार आहे.
शिवाजी आढळराव पाटलांना राष्ट्रवादीतून अमोल कोल्हेंच्या विरोधात मैदानात उतरवण्यासाठी सुरुवातीला चांगलाच विरोध होता. मात्र हा विरोध अजित पवारांनी दूर केला आणि त्यासाठी अनेकदा बैठकादेखील घेतल्या. अनेकांच्या समजूतीदेखील काढाव्या लागल्या.