पत्नी, सासू, मेव्हणा मेव्हनीचा खून करणाऱ्या प्रदिपला फाशीची शिक्षा!

चारित्र्याच्या संशयावरून पत्नी तसेच सासू, मेव्हणा आणि मेव्हणीचा खून करणाऱ्या प्रदीप विश्‍वनाथ जगताप (वय ४०, रा.कवठेगुलंद ता. शिरोळ, सध्या रा. शिरगांवे मळा, पार्वती औद्योगिक वसाहतीच्या मागे, यड्राव) याला फाशीची शिक्षा व दहा हजार दंड अशी शिक्षा (Jaysingpur Court) ठोठावण्यात आली. येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश न्यायाधीश जी. बी. गुरव यांनी शिक्षा सुनावली.

यड्राव (ता. शिरोळ) येथे सहा ऑक्टोबर २०१८ रोजी पहाटे पत्नी रूपाली हिच्या चारित्र्यावर संशय घेऊन प्रदीप जगतापने भांडण काढले. त्यानंतर त्याने मागाच्या लाकडी माऱ्‍याचे प्रहार करीत पत्नीसह सासू, मेव्हणी, मेव्हणा या चौघांचा खून केला होता.

सरकार पक्षातर्फे २४ साक्षीदार तपासल्यानंतर दुर्मिळातील दुर्मिळ घटना असल्याने व एकच वेळी चार व्यक्तींचा खून झाल्याने आरोपी प्रदीप जगतापला मरेपर्यंत फाशीची शिक्षा व दहा हजार दंड अशी शिक्षा सुनावण्यात आली. दंड न भरल्यास एक वर्षाची सक्तमजुरी अशीही त्यात तरतूद आहे