लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्यात निवडणूक होणाऱ्या महाराष्ट्रातील 8 लोकसभा मतदारसंघात आज अधिसुचना जारी केली जाणार आहे. ज्यात मराठवाड्यातील परभणी, नांदेड, हिंगोलीसह विदर्भातील बुलढाणा, अमरावती (Amravati), वाशीम (Washim), यवतमाळ (Yavatmal), अकोला (Akola), वर्धा (Wardha) जिल्ह्याचा समावेश आहे. आज अधिसुचना जारी केल्यानंतर या 8 ही लोकसभा मतदारसंघात उमेदवारी अर्ज विक्री करण्यास सुरवात होईल. तसेच उमेदवारी अर्ज दाखल करण्याला सुरुवात होणार आहे.
लोकसभा निवडणूक दुसरा टप्पा वेळापत्रक
- नामांकन : 28 मार्च 2024
- उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख : 04 एप्रिल 2024
- नामांकनांची छाननी : 05 एप्रिल 2024
- उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख : 08 एप्रिल 2024
- मतदान : 26 एप्रिल 2024
दुसऱ्या टप्प्यातील जिल्हे
परभणी, नांदेड, हिंगोली, बुलढाणा, अमरावती, वाशीम, यवतमाळ, अकोला
इच्छुकांना ऑफलाईनसह सुविधा तसेच संकेतस्थळावरून ऑनलाईन अर्ज दाखल करण्याची सुविधा मिळणार आहे. ऑफलाईन अर्ज करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात व्यवस्था करण्यात आली आहे. या ठिकाणी कोरे अर्ज मिळणे, अनामत रक्कम स्वीकारणे, नामांकन अर्ज स्वीकारणे आदींची व्यवस्था करण्यात आली आहे. खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना 25 हजार, तर मागास प्रवर्गातील उमेदवारांना 12 हजार 500 रुपये नामांकन अर्ज सादर करताना भरणे आवश्यक आहे.
उमेदवारांनी लोकसभा निवडणुकीचे आर्थिक व्यवहार करण्यासाठी स्वतंत्र बँक खाते नव्याने उघडावे. हे खाते उमेदवाराला स्वत:चे नावे किंवा निवडणूक प्रतिनिधीसोबत संयुक्तरित्या काढता येईल. सदर बँक खाते नामनिर्देशनपत्र दाखल करण्याच्या किमान एक दिवस अगोदर उघडलेले असणे आवश्यक असून यात केवळ निवडणुकीशी संबंधीतच व्यवहार करायचे आहेत.