ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी समृद्धी महामार्गावर झालेल्या अपघातावरुन सरकारवर हल्लाबोल केला. समृद्धी महामार्ग शापि्त असून लोकांचा शाप त्याला लागलाय असं ते म्हणाले. तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री छगन भुजबळ यांच्यावर टीका केली. राज्यातील जनतेला आरक्षण देण्याची आश्वासने दिली, पण आता नेत्यांना याचा विसर पडलाय. समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न होतोय अशी टीका त्यांनी यावेळी केली.
देवेंद्र फडणवीस आणि छगन भुजबळ राजकारण करत आहेत. फडणवीस म्हणाले होते कॅबिनेटच्या पहिल्या बैठकीत धनगरांना आरक्षण देऊ. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाला आरक्षण देण्याचे आश्वासन दिले होते. त्याचं काय झालं. जरांगे पाटील यांच्या सभेला मोठ्या प्रमाणात लोक जमले होते. त्यावरुन समाजातील आक्रोश दिसतोय, असं राऊत म्हणाले.
समृद्धी महामार्गावर दररोज हत्या होत आहेत. या सरकारी हत्या आहेत. त्यामुळे सरकारविरोधात मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी आमची मागणी आहे. संबंधित मंत्र्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी व्हायलाच पाहिजे, असं संजय राऊत म्हणाले.
छगन भुजबळ दोन समाजामध्ये फूट आणि आग लावणारे आहेत. हा विषय संयमाने हाताळला पाहिजे. राज्यातील घटकांना अस्वस्थ करुन अशी आग लावता येणार नाही. जातीय आणि सामाजिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न सरकारमधील मंत्री करत आहेत, अशी टीका त्यांनी यावेळी केली.
समृद्धी महामार्गावर बोलताना ते म्हणाले की, जमिनी ओरबाडून घेतल्या. लहान लहान उद्योग उठवण्यात आले. याचे हे शाप आहेत. सबुरीने घेता आलं असतं, पण महामार्ग घाईघाईत बनवून श्रेय घेण्याचा प्रयत्न झाला. याचे फळ जनता भोगत आहे. गेल्या वर्षभरात भीषण अपघात झाले आहेत. याची जबाबदारी घ्यायला कोणी तयार नाही, अशी टीका त्यांनी केली.
देवेंद्र फडणवीसांवर टीका करताना ते म्हणाले की समृद्धी महामार्गाचे तुम्ही श्रेय घेतले आता अपघाताची जबाबदारी देखील तुम्ही घ्या. महामार्गात सुधारणा करुन काही प्राण वाचवता आले तर पाहा. समृद्धीवर कोठे थांबा नाही. विश्रांतीला जागा नाही. महामार्ग पूर्ण रखरखीत आहे.