विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेतील भारताच्या विजयानंतर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे तरुणांनी एकच जल्लोष केला. पारंपरिक प्रतिस्पर्धी असणाऱ्या भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यामध्ये अहमदाबाद येथे सामना झाला. एकतर्फी विजय मिळवत भारतीय संघाने स्पर्धेतील आपली घोडदौड सुरू ठेवली.
विजयाची चाहूल लागताच अनेक तरुणांनी आपला मोर्चा चौकाकडे वळवला. विजय जवळ येईल तसे राष्ट्रध्वज व भगव्या झेंड्यांसह गर्दी वाढू लागली. पार्टी स्पीकरवर विजयी गीत वाजवत अनेकजण चौकात थिरकू लागले. चौकार खेचत विजयावर शिक्कामोर्तब होताच एकच जल्लोष, आतषबाजी करण्यात आली. सुमारे तासभर चाललेल्या जल्लोषानंतर पोलिसांनी येथील गर्दी पांगवत परिसर मोकळा केला.
इचलकरंजीत मलाबादे चौकात जल्लोष
भारताचा एकतर्फी विजय झाल्यानंतर मलाबादे चौकात दिवाळीच साजरी होताना दिसली. घटस्थापनेच्या पूर्वसंध्येला खरेदीसाठी गजबजलेल्या गर्दीत जल्लोषाची गर्दी झाल्याने मुख्य मार्ग फुलून गेला होता. एखादी मोटारसायकल रॅली निघावी त्याप्रमाणे शहरातील रस्त्यांवर दुचाकीचालक गाड्यांना झेंडे लावून विजयाचा जल्लोष करत होते. पाकविरुद्धचा सामना भारताने जिंकल्यावर शहरातील मलाबादे चौकात जल्लोष ही इचलकरंजीची परंपरा ठरली आहे. याप्रमाणे परिसरात जल्लोष करण्यासाठी मोठ्या प्रमाणात तरुण, नागरिकांची गर्दी जमली.