गेल्या अनेक दिवसांपासून सर्वांनाच प्रतीक्षा असलेल्या पवासाचे अखेर राज्यात आगमन झाले आहे. उकाडा आणि आर्द्रतेमुळे हैराण झालेल्या मुंबईकरांनाही पावसामुळे थोडा दिलासा मिळाला आहे. पहाटेपासूनच मुंबईत विविध भागात पावसाच्या जोरदार सरी कोसळत असून त्यामुळे वातावरणात थोडा गारवा निर्माण झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्याती नागरिकांना प्रचंड उन्हाचे चटके आणि असह्य उकाडा सहन करावा लागत होता. मात्र आज पावसाचे आगमन झाल्यामुळे तापमानात काहीशी घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळू शकतो.
दरम्यान पुढील तीन-चार दिवसात राज्यात मुसळधार पाऊस होऊ शकतो, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. कोकणात सर्वत्र विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता असून त्यासोबतच सरासरी 50-60 किमी प्रति तास वेगाने वारे वाहण्याचा अंदाज आहे. तर रत्नागिरीसाठी आज ऑरेज अलर्ट असून त्यामध्ये 100 मिमीहून अधिक पाऊस काही ठिकाणी पाहायला मिळू शकतो , असाही अंदाज वर्तवतण्यात आला आहे. सिंधुदुर्गासाठी देखील आज रेड अलर्ट असून काहीठिकाणी अतिवृष्टी होऊ शकते.
तर कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील घाट माथ्यावर देखील काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. कोल्हापूर आणि साताऱ्यातील घाट माथ्यावर अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे. तसेच मराठवाड्यात आज अनेक जिल्ह्यात हलक्या पावसाची शक्यता आहे. मात्र विदर्भात वादळी वाऱ्यांसह सर्वत्र पावसाची शक्यता असून संपूर्ण विदर्भासाठी आज यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
महाराष्ट्रात अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यांसह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. सहयाद्रीच्या पर्वत रांगेत वसलेल्या मावळमध्येही मान्सूनचं जोरदार आगमन झाले असून रात्रभर मुसळधार पाऊस सुरू होता. तसेच पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. मागील काही दिवसांपासून नागरिकांना उन्हाचे चटके आणि असह्य उकाडा सहन करावा लागत होता मात्र पावसाच्या आगमनामुळे तापमानात काहीशी घट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे .