राज्यात वाढणार थंडीचा कडाका! भरणार हुडहुडी……

हवामानात सतत होणाऱ्या बदलामुळे अनेक आजार तसेच शेतकरी यांचे खूपच नुकसान होत चाललेले आहे. कधी अवकाळी तर कधी थंडी तर कधी कडक ऊन असे बदलते हवामान यामुळे नागरिकांचे आरोग्य देखील धोक्यात आलेले आहे.

पश्चिमेने येणारे थंड वारे आणि आग्नेय दिशेने येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यांच्या संयोगामुळे राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाच्या हलक्या सरी सुरु होत्या. दरम्यान आजपासून पावसाचे प्रमाण एकदम कमी होईल आणि थंडीचा कडाका वाढेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. राज्यातील बहुतांश भागांमध्ये हवामान कोरडे राहिल. त्यामुळे थंडीत वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

राज्यातील बहुतांश भागात पावसाने हजेरी लावली. हवामान विभागाने दिलेली माहिती अशी की, अरबी समुद्रात तयार झालेली हवेची द्रोणीय रेषा, आग्नेय दिशेने येणारे बाष्पयुक्त वारे आणि पश्चिमेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यामुळे राज्यात पावसाने हजेरी लावली. मागील दोन-तीन दिवसांपासून राज्याच्या विविध भागांत अवकाळी पावसाच्या हलक्या सरी पडल्या. बुधवारी पावसाचा जोर कमी होत असल्याचे दिसून आले.

दरम्यान आजपासून पावसाचा जोर कमी होईल. त्यामुळे राज्यातील ढगाळ हवामान कमी होणार असून कोरडे वातावरण निर्माण होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यामुळे किमान तापमान चार ते पाच अंश सेल्सिअसने कमी होण्याचा अंदाज आहे. प्रामुख्याने विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात गारवा वाढण्याचा अंदाज व्यक्त केला जातोय.