काँग्रेस आणि ठाकरे गटामध्ये कलह सुरूच….

सांगली लोकसभेच्या जागेवरुन महाविकास आघाडीमधील काँग्रेस आणि ठाकरे गटामध्ये कलह सुरू आहे. ठाकरे गटाकडून सांगलीमध्ये उमेदवारी जाहीर करण्यात आली असून काँग्रेसने या उमेदवारीला विरोध केला आहे.अशातच आता सांगलीच्या जागेवरुन सुरू असलेल्या वादाचे कोल्हापुरात पडसाद उमटल्याचे पाहायला मिळत आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, सांगली लोकसभा मतदारसंघात चंद्रहार पाटील यांच्या उमेदवारीवरून शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. ठाकरे गटप्रमुख, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मेळाव्याकडे काँग्रेस कार्यकर्त्यांनी फिरवलेली पाठ त्याला कारणीभूत ठरली आहे.

जोपर्यंत काँग्रेसचे (Congress) विशाल पाटील ‘मशाल’ हातात धरत नाहीत, तोपर्यंत शिवसेना ठाकरे गटाने महाविकास आघाडीच्या उमेदवारांचे प्रचार थांबवावेत, असे तोंडी आदेश ‘मातोश्री’वरून निघाल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे. त्याचे पडसाद आता कोल्हापुरातील शिवसेना ठाकरे गटातील प्रमुखांपेक्षा होम पिचवर लढणाऱ्या स्थानिक शिवसैनिकांमध्ये उमटत आहेत.
जर सांगलीमध्ये महाविकास आघाडी (Mahavikas Aaghadi) म्हणून मदत करणार नसतील तर आपण ही मदत का करायची? अशी भावना कोल्हापुरातील शिवसैनिकांच्या मनात निर्माण होत आहे. तसेच महाविकास आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार शाहू महाराज छत्रपती यांच्या प्रचाराकडेही शिवसैनिकांनी पाठ फिरवल्याचे सांगण्यात येत आहे.